Google New Feature : तुम्ही अनेक वर्षांपूर्वी तयार केलेला तुमचा ईमेल आयडी आता तुम्हाला आवडत नसेल किंवा तो प्रोफेशनल वाटत नसेल, तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. गुगलने (Google) वापरकर्त्यांना त्यांचा ईमेल पत्ता बदलण्याची परवानगी देणारे नवीन फिचर लाँच केले आहे. मात्र, हे फिचर वापरताना गुगलने काही महत्त्वाच्या अटी आणि मर्यादा घातल्या आहेत.
नेमके काय बदलणार?
गुगलच्या अहवालानुसार, गुगलने त्यांच्या सपोर्ट पेजवर ईमेल पत्ता बदलण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली आहे. ज्या वापरकर्त्यांनी 'थर्ड पार्टी' ईमेल आयडी वापरून गुगल खाते तयार केले आहे, त्यांना त्यांचा पत्ता बदलणे अधिक सोपे होणार आहे. मात्र, मूळ @gmail.com असलेल्या वापरकर्त्यांसाठी देखील काही बदल प्रस्तावित आहेत.
पत्ता बदलण्यासाठीच्या अटी आणि शर्ती
– वापरकर्ते वर्षभरातून फक्त एकदाच आपला ईमेल पत्ता बदलू शकतील.
– एका गुगल खात्याचा ईमेल पत्ता आयुष्यात जास्तीत जास्त चार वेळा बदलता येईल.
– ज्यांचे ईमेल @gmail.com ने संपतात, त्यांना हे नाव बदलण्याची संधी केवळ तीन वेळा मिळेल.
– ईमेल पत्ता बदलला तरी तुमच्या खात्यातील फोटो, व्हिडिओ, गुगल ड्राईव्हमधील डेटा किंवा जुने मेल्स सुरक्षित राहतील. त्यावर कोणताही परिणाम होणार नाही.
– तुम्ही तुमचा जुना ईमेल आयडी बदलला तरी तो पत्ता तुमच्याच नावावर राहील. तो अन्य कोणत्याही नवीन वापरकर्त्याला दिला जाणार नाही.
जुने आणि नवीन मेल्सचे काय?
गुगलने स्पष्ट केले आहे की, एकदा तुम्ही नवीन ईमेल पत्ता सेट केला की, तुमच्या जुन्या आयडीवर येणारे मेल्स देखील नवीन खात्यावर आपोआप प्राप्त होतील. यामुळे महत्त्वाचे संपर्क तुटण्याची भीती राहणार नाही. टेलिग्रामवरील 'गुगल पिक्सेल हब' ग्रुपवर सर्वात आधी ही माहिती समोर आली. आता वापरकर्त्यांना त्यांच्या गुगल अकाउंटमधील 'युजरनेम' बदलून या फिचरचा अनुभव घेता येणार आहे.