राष्ट्रीय परीक्षा संस्था (NTA) ने 21 जून 2026 रोजी होणाऱ्या NEET UG 2026 परीक्षेसाठी विद्यार्थ्यांसाठी काही महत्त्वाचे बदल जाहीर केले आहेत. यानुसार परीक्षेचा कालावधी 180 मिनिटांवरून 195 मिनिटे (3 तास 15 मिनिटे) करण्यात आला आहे. तसेच प्रश्नपत्रिकेत रफ कामासाठी उपलब्ध पानांची संख्याही वाढवण्यात आली आहे.
NTA च्या माहितीनुसार, परीक्षा दुपारी 2 ते सायंकाळी 5.15 या वेळेत होईल. या कालावधीत उपस्थिती नोंदवणे आणि इतर अनिवार्य प्रशासकीय प्रक्रिया यांचाही समावेश असेल. त्यामुळे विद्यार्थ्यांचा प्रत्यक्ष प्रश्न सोडवण्याचा वेळ कमी होणार नाही, असा दावा संस्थेने केला आहे.
हेही वाचा – MAH CET Result 2026: BBA, BCA, BMS सीईटीचा निकाल जाहीर; 5 गुणवंतांना 100 पर्सेन्टाईल, अशी आहे टॉपर्सची यादी
याशिवाय, रफ कामासाठी पूर्वी दोन पाने दिली जात होती, ती आता चार करण्यात आली आहेत. त्यापैकी दोन पाने प्रश्नपत्रिकेच्या सुरुवातीला आणि दोन शेवटी असतील. विशेषतः डावखुऱ्या विद्यार्थ्यांच्या सोयीचा विचार करून हा बदल करण्यात आल्याचे NTA ने स्पष्ट केले आहे.
NTA ने म्हटले आहे की, विद्यार्थ्यांकडून मिळालेल्या अभिप्रायाच्या आधारे हे बदल करण्यात आले असून परीक्षा अधिक सोयीस्कर, सुरक्षित आणि विद्यार्थी-केंद्रित करण्याचा उद्देश आहे.