Petrol Diesel LPG Rate Today: अमेरिका आणि इराण यांच्यातील वाढत्या तणावाचा परिणाम जागतिक ऊर्जा बाजारावर होत असून त्याचे पडसाद भारतातही उमटू लागले आहेत. या आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे स्वयंपाकाच्या गॅसच्या (LPG) किमतीत झालेली वाढ सामान्य नागरिकांच्या खिशाला चटके देणारी ठरत आहे. मात्र, आजच्या ताज्या दरांचा विचार करता, सरकारने घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत कोणताही नवा बदल केलेला नाही, ही काहीशी दिलासादायक बाब आहे.
मुख्य शहरांमधील LPG सिलिंडरचे दर
देशातील प्रमुख महानगरांमध्ये घरगुती गॅस सिलिंडरचे दर आजही स्थिर आहेत. आजचे दर खालीलप्रमाणे आहेत:
नवी दिल्ली: 913.00
मुंबई: 912.50
कोलकाता: ₹939.00
चेन्नई: 928.50
पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत स्थिरता
पेट्रोल आणि डिझेलच्या बाबतीत बोलायचे झाल्यास, आज 26 एप्रिल रोजी देशभरात इंधनाचे दर स्थिर आहेत. दिल्लीमध्ये पेट्रोलचा दर 94.77 प्रति लिटरवर कायम आहे. एप्रिल 2026 या संपूर्ण महिन्यात पेट्रोलच्या दरात कोणतीही मोठी चढ-उतार पाहायला मिळालेली नाही. देशातील प्रमुख महानगरांमधील पेट्रोल आणि डिझेलच्या दरांचा आढावा घेतल्यास असे दिसून येते की, मुंबईमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 104.21 रुपये असून डिझेलचा दर 92.15 रुपये इतका आहे. कोलकाता शहरात पेट्रोल 103.94 रुपये आणि डिझेल 90.76 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे. तसेच, चेन्नईमध्ये पेट्रोलची किंमत प्रति लिटर 100.75 रुपये असून डिझेलसाठी ग्राहकांना 92.34 रुपये मोजावे लागत आहेत.
ऊर्जा संकटाचा सामना करण्यासाठी सरकारचा '5-किलो सिलिंडर'वर भर
पश्चिम आशियातील 'हॉर्मुझ सामुद्रधुनी'मधील तणावाच्या पार्श्वभूमीवर, भारताचा इंधन पुरवठा खंडित होऊ नये यासाठी पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय सतर्क झाले आहे. सरकारने 5-किलोच्या FTL (फ्री ट्रेड LPG) सिलिंडर्सच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी देशभरात 8,770 हून अधिक जनजागृती शिबिरे आयोजित केली आहेत. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासून आतापर्यंत 1,38,000 हून अधिक अशा लहान सिलिंडर्सची विक्री झाली आहे.
नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन
देशात पेट्रोलियम उत्पादने आणि एलपीजीचा साठा पुरेसा असून पुरवठा सुरळीत राहील, असे आश्वासन मंत्रालयाने दिले आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊन इंधनाची अतिरिक्त खरेदी (Panic-buying) करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच ग्राहकांनी गॅस बुकिंगसाठी डिजिटल माध्यमांचा वापर करावा आणि सौर ऊर्जा, इलेक्ट्रिक इंडक्शन किंवा पीएनजी (PNG) सारख्या पर्यायी इंधनांकडे वळण्याचे प्रोत्साहनही सरकारकडून दिले जात आहे.