Gainesville Plane Crash Pilot Massage : अमेरिकेतील जॉर्जिया राज्यातून एक अंगावर शहारे आणणारी घटना समोर आली आहे. इंजिन निकामी झाल्यामुळे मृत्यू समोर उभा असताना एका पायलटने नियंत्रण कक्षाला (ATC) दिलेला शेवटचा निरोप आणि त्यानंतर घडलेला चमत्कार सध्या जगभरात चर्चेचा विषय ठरला आहे.
उड्डाणानंतर काही क्षणांतच इंजिन फेल
सोमवार, 9 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी 12:05 च्या सुमारास पायलट थॉमस रॉजर्स आणि त्यांचा सहकारी ‘हॉकर बीचक्राफ्ट BE-36’ या एका इंजिनच्या विमानाने जॉर्जियातील गेन्सविले येथील ली गिल्मर मेमोरियल विमानतळावरून उड्डाण केले. मात्र, उड्डाण केल्यानंतर काही मिनिटांतच विमानाचे इंजिन बंद पडले. विमान पुन्हा विमानतळावर नेण्यासाठी लागणारी पुरेशी उंची आणि ऊर्जा त्यांच्याकडे नव्हती. थॉमस रॉजर्स यांनी “आम्ही इंजिन गमावले आहे आणि आम्ही परत येण्याचा प्रयत्न करत आहोत,” असा संदेश आधी दिला होता.
“माझ्या पत्नीला सांगा, मी तिच्यावर प्रेम करतो…”
जेव्हा रॉजर्स यांना खात्री पटली की विमान आता विमानतळापर्यंत पोहोचू शकणार नाही आणि रस्ते वाहनांनी गजबजलेले आहेत, तेव्हा त्यांना आपला मृत्यू निश्चित वाटला. याच वेळी नियंत्रण कक्षाला (ATC) दिलेला त्यांचा निरोप अत्यंत भावूक होता. ते म्हणाले, “आम्ही कदाचित पोहोचू शकणार नाही. प्लीज माझी पत्नी मॉली हिला सांगा की, मी तिच्यावर खूप प्रेम करतो… आणि माझ्या आई-वडिलांना सांगा, माझे त्यांच्यावरही खूप प्रेम आहे.” हा निरोप देताना रॉजर्स यांचा आवाज थरथरत होता, जो एटीसीच्या ऑडिओ रेकॉर्डिंगमध्ये कैद झाला आहे.
हेही वाचा – Nashik Viral Photo Fact : भूत की अफवा?, जाणून घ्या व्हायरल फोटोमागील सत्य; काय म्हणाले गावकरी
महामार्गावरील वर्दळीत थरारक लँडिंग
समोर मृत्यू दिसत असतानाही रॉजर्स यांनी विमानाचे नियंत्रण सोडले नाही. त्यांनी विमान गेन्सविलेमधील अत्यंत रहदारीच्या ‘ब्राउन्स ब्रिज रोड’वर उतरवण्याचा धाडसी निर्णय घेतला. विमानाचे लँडिंग होताच ते 3 गाड्यांना जाऊन धडकले आणि एका कारमध्ये विमानाची इंधन टाकीही उडून पडली. ही जागा ‘गोल्डन कोरल’ हॉटेलच्या अगदी जवळ होती. शेकडो वाहनांच्या गर्दीत विमान उतरवूनही ते केवळ तीन गाड्यांना धडकले, ही एक मोठी किमया मानली जात आहे.
Small plane pilot said “tell my wife I love her” before making emergency landing and crashing into vehicles on a busy road “Mayday!… We’re not going to make it. Please, tell my wife, Molly, I love her and my parents. I love them so much.” A Hawker Beechcraft BE-36 made an… pic.twitter.com/jwemh2cboW — Unlimited L's (@unlimited_ls) February 10, 2026
अखेरचा निरोप आणि त्यानंतर ‘सुखद’ धक्का
या भीषण अपघातानंतर विमानाचा चक्काचूर झाला असला, तरी एक मोठा चमत्कार घडला. विमानातील दोन्ही पायलट सुखरूप बाहेर आले. रस्त्यावरील गाड्यांमधील केवळ 2 व्यक्तींना किरकोळ दुखापत झाली, ज्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. थॉमस रॉजर्स यांनी आपल्या कुटुंबाला जो शेवटचा निरोप दिला होता, तो सुदैवाने अखेरचा ठरला नाही. काही वेळानंतर त्यांनीच नियंत्रण कक्षाला सांगितले, “आम्ही ठीक आहोत.” या थरारक घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत.
हेही वाचा – जगाला निकृष्ट दर्जाचा माल विकणाऱ्या चीनचा रस्ताही निघाला ‘चायनामेड’; पाहा कसा झाला गायब, CCTV फुटेज व्हायरल