Egg Prices Hike: पश्चिम आशियातील युद्धजन्य परिस्थितीमुळे आधीच देशात इंधन आणि भाजीपाला महागला असताना आता अंड्यांच्या दरानेही ऐतिहासिक उच्चांक गाठला आहे. यंदाच्या उन्हाळ्यात वाढलेल्या असह्य तापमानामुळे कुक्कुटपालन व्यवसायाला मोठा फटका बसला असून, देशातील सुमारे 15 टक्के कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे. साधारणपणे 38 अंश सेल्सिअसच्या वर तापमान गेल्यास कोंबड्या मरण्याचे प्रमाण वाढते. पोल्ट्री चालकांनी तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या, तरीही महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि मध्य प्रदेश या राज्यांमध्ये कोंबड्या मोठ्या संख्येने दगावल्या. यामुळे अंड्यांच्या उत्पादनात 15 टक्क्यांची मोठी घट झाली असून, बाजारात अंडी देणाऱ्या कोंबड्यांचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे.
किरकोळ बाजारात अंड्याचा दर 8 ते 10 रुपयांवर
तथापि, नवीन पिलांच्या संगोपनासाठी आणि ती अंडी देण्यायोग्य होण्यासाठी पोल्ट्री चालकांना कमीत कमी 4 ते 5 महिने वाट पाहावी लागणार आहे. पुरवठ्यातील या तुटवड्यामुळे मुंबई आणि पुण्याच्या किरकोळ बाजारात एका अंड्याची किंमत 8 ते 10 रुपयांवर पोहोचली आहे. या दरवाढीमुळे ग्राहकांना आता एका डझन अंड्यांसाठी तब्बल 96 रुपये मोजावे लागत आहेत. बाजारातील तज्ज्ञांच्या मते, हा पुरवठा सुरळीत होण्यास वेळ लागणार असल्याने पुढील काही महिने अंड्याचे दर चढेच राहण्याची शक्यता आहे.
आंतरराष्ट्रीय संकटामुळे कोंबड्यांचे खाद्यही महागले
दरम्यान, अंड्यांचे उत्पादन घटण्यासोबतच पोल्ट्री चालकांचा उत्पादन खर्चही कमालीचा वाढला आहे. कोंबड्यांच्या खाद्यासाठी लागणारा मका, सोया पेंड आणि इतर आवश्यक पोषक घटक मोठ्या प्रमाणावर परदेशातून मागवले जातात. मात्र, पश्चिम आशियातील सुरू असलेल्या संघर्षामुळे जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत झाली असून या वस्तूंची आयात महागली आहे. आयात शुल्क आणि वाहतूक खर्च वाढल्याने कोंबड्यांच्या खाद्याचे दर कडाडले आहेत, ज्याचा थेट परिणाम अंड्यांच्या किमती वाढण्यावर झाला आहे.