पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात एका अंगणवाडी सेविकेच्या निलंबन प्रकरणाला अखेर दिलासा मिळाला आहे. अंगणवाडीत वितरित करण्यात आलेल्या पोषण आहाराच्या गुणवत्तेबाबत प्रश्न उपस्थित केल्यानंतर निलंबित करण्यात आलेल्या देवयानी शिवाजी पारधी यांच्यावरील कारवाई जिल्हा परिषद प्रशासनाने मागे घेतली आहे. चास ठाकरवाडी ग्रामपंचायतीअंतर्गत असलेल्या नंबरवाडी अंगणवाडी केंद्रात आलेल्या पोषण आहाराचा दर्जा समाधानकारक नसल्याचा दावा करत देवयानी पारधी यांनी त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता. हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाल्यानंतर एकात्मिक बाल विकास प्रकल्प विभागाने शिस्तभंगाचे कारण देत त्यांना निलंबित केले होते.
मात्र, या निर्णयानंतर राज्यभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. अंगणवाडी सेविका संघटना, सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन (CITU) तसेच विविध सामाजिक संघटनांनी या कारवाईला विरोध दर्शवला. पोषण आहाराच्या गुणवत्तेचा मुद्दा मांडणाऱ्या कर्मचाऱ्याला शिक्षा करण्याऐवजी या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणीही करण्यात आली. या प्रकरणाने राजकीय स्तरावरही चर्चा रंगली. विविध नेत्यांनी रेशमा पारधी यांचे निलंबन तातडीने रद्द करण्याची मागणी केली. वाढत्या दबावानंतर जिल्हा परिषद प्रशासनाने निर्णयाचा फेरविचार केला. जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांनी रेशमा पारधी यांच्यावरील निलंबनाची कारवाई रद्द करण्यात आल्याची माहिती दिली. त्यामुळे या प्रकरणाचा तात्पुरता शेवट झाला असला, तरी अंगणवाड्यांमधील पोषण आहाराच्या गुणवत्तेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे.