जंगल जंगल बात चली है पता चला है… ‘राजकुमार’ जन्माला आलाय! या चिमुकल्या पिल्लाला मिळतेय चक्क Z+ सुरक्षा

10 वर्षांनंतर झालेल्या या यशस्वी प्रजननामुळे ही दुर्मिळ प्रजाती पुन्हा एकदा आकाशात उंच भरारी घेऊ शकेल, अशी आशा निर्माण झाली आहे.

जंगल जंगल बात चली है पता चला है… ‘राजकुमार’ जन्माला आलाय! या चिमुकल्या पिल्लाला मिळतेय चक्क Z+ सुरक्षा

Great Indian Buster Chick Born in Kutch 2026 : गुजरातच्या कच्छमधील रखरखत्या वाळवंटात एका इवल्याशा पिल्लाचा जन्म झाला आहे. जेव्हा हे पिल्लू अंड्याचं कवच फोडून बाहेर आलं, तेव्हा 50 जवानांसह अत्याधुनिक यंत्रणा त्याच्या स्वागतासाठी सज्ज होती. या चिमुकल्यावर दुर्बिणी रोखलेल्या होत्या. एखाद्या बड्या नेत्याला दिली जाते तशी Z+ दर्जाची सुरक्षा व्यवस्था याच्यासाठी तैनात करण्यात आली आहे. तब्बल 10 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर जन्मलेल्या या ‘राजकुमार’च्या संरक्षणासाठी वनविभागाचे 50 जवान रात्रंदिवस पहारा देत आहेत. हा पक्षी इतका दुर्मिळ आहे की त्याच्यासाठी संपूर्ण परिसरातील रस्ते बंद करण्यात आले असून, आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने त्याच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवले जात आहे.

ग्रेट इंडियन बस्टर्ड: जगातील सर्वात दुर्मिळ पाहुण्याचे आगमन
गुजरातच्या कच्छमध्ये ज्या चिमुकल्या पिल्लाची चर्चा आहे, ते जगातील अत्यंत दुर्मिळ प्रजातींपैकी एक असलेल्या ‘ग्रेट इंडियन बस्टर्ड’ (माळढोक) या पक्ष्याचे आहे. 26 मार्च 2026 रोजी या पिल्लाचा जन्म झाला. गेल्या 10 वर्षांपासून गुजरातमध्ये या पक्ष्याच्या संख्येबाबत चिंतेचे वातावरण होते, त्यामुळे या नवीन जन्माला वनविभागाने ‘राजकुमार’ असा दर्जा दिला आहे. या पक्ष्याची प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर असल्याने, या एका पिल्लाचे जगणे संपूर्ण निसर्गप्रेमींसाठी आणि प्रशासनासाठी अत्यंत प्रतिष्ठेचे बनले आहे.

50 जवान आणि 24 तास अत्याधुनिक देखरेख
या चिमुकल्या ‘राजकुमार’च्या संरक्षणासाठी वनविभागाचे 50 हून अधिक कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. हे कर्मचारी 3 शिफ्टमध्ये 24 तास काम करत आहेत. पिल्लाचा अधिवास असलेला परिसर ‘नो-मॅन्स लँड’ म्हणून घोषित करण्यात आला असून, तिथे सर्वसामान्यांच्या प्रवेशावर कडक बंदी घालण्यात आली आहे. वॉच टॉवरवरून अत्याधुनिक दुर्बिणी आणि स्पॉटिंग स्कोपच्या साहाय्याने पिल्लाच्या प्रत्येक क्षणाचे अपडेट थेट गांधीनगर आणि अहमदाबाद येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले जात आहेत.

हेही वाचा – Bird Migration : हा निसर्गाचाच चमत्कार! चिमुकला पक्षी सलग 11 दिवस हवेत उडत राहिला; पाणीही न पिता पार केले 13,500 किमीचे अंतर

पाण्याचे नैसर्गिक स्रोत मुद्दाम कोरडे केलेत.. कशासाठी?
पिल्लाला नैसर्गिक शत्रूंपासून म्हणजेच कुत्रे, कोल्हे आणि इतर हिंस्र प्राण्यांपासून वाचवण्यासाठी वनविभागाने विशेष रणनीती आखली आहे. परिसरातील पाण्याचे नैसर्गिक स्रोत मुद्दाम कोरडे करण्यात आले आहेत, जेणेकरून तहानलेले हिंस्र प्राणी पिल्लाच्या जवळ येणार नाहीत. याशिवाय, तुटलेली कुंपणे दुरुस्त करण्यात आली असून गावकऱ्यांना त्यांची गुरे चरायला आणण्यास सक्त मनाई केली आहे. मादी माळढोक पक्ष्यावर ट्रॅकिंग टॅग लावण्यात आले आहेत, जेणेकरून धोक्याची चाहूल लागताच बचाव पथक काही मिनिटांत तिथे पोहोचू शकेल.

निसर्गप्रेमींसाठी आशेचा किरण
माळढोक पक्ष्याचे हे पिल्लू केवळ वनविभागाच्या परिश्रमाचे फळ नाही, तर जैवविविधता टिकवण्यासाठी एक आशेचा किरण आहे. हा पक्षी आकाराने मोठा असल्याने आणि उडताना अडथळे येत असल्याने त्यांची संख्या वेगाने घटली होती. मात्र, 10 वर्षांनंतर झालेल्या या यशस्वी प्रजननामुळे ही दुर्मिळ प्रजाती पुन्हा एकदा आकाशात उंच भरारी घेऊ शकेल, अशी आशा निर्माण झाली आहे. संपूर्ण प्रशासन सध्या डोळ्यात तेल घालून या ‘राजकुमार’चे रक्षण करत आहे.

हेही वाचा – 5G Internet Usage: भारतीय वापरकर्ते दरमहा उडवतायत ‘इतका’ GB डेटा; 5G वापरामध्ये भारत जगात दुसऱ्या स्थानावर

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number