RBI Credit Card Rules: क्रेडिट कार्ड आज अनेकांच्या दैनंदिन आर्थिक व्यवहाराचा महत्त्वाचा भाग बनला आहे. खरेदी, ऑनलाईन पेमेंट्स किंवा आपत्कालीन खर्चासाठी हे कार्ड उपयुक्त ठरते. मात्र याच क्रेडिट कार्डशी संबंधित नियम आणि अटींबाबत अनेक ग्राहकांमध्ये संभ्रम असतो. या पार्श्वभूमीवर रिजर्व्ह बँक ऑफ इंडियाने ग्राहकांच्या हितासाठी काही महत्त्वाचे निर्देश लागू केले आहेत.
सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे ग्राहकाच्या स्पष्ट संमतीशिवाय कोणतीही बँक क्रेडिट कार्ड जारी करू शकत नाही. अनेकदा काही बँका प्री-अप्रूव्हड ऑफरच्या नावाखाली कार्ड पाठवतात. मात्र जर ग्राहकाने ते मागवले नसेल, तर ते सक्रिय करणे बंधनकारक नाही. कार्ड मिळाल्यानंतर पिन तयार न केल्यास किंवा कोणतीही सक्रियता प्रक्रिया न केल्यास बँकेला निश्चित कालावधीत ते कार्ड बंद करावे लागते. यासाठी ग्राहकाकडून कोणतेही शुल्क आकारले जाऊ शकत नाही.
हेही वाचा: Property Rights : वडिलांच्या मृत्यूनंतर मालमत्तेवर हक्क कोणाचा? मृत्यूपत्राशिवाय होणाऱ्या वाटणीचे कायदेशीर नियम जाणून घ्या
तसेच, कार्ड सक्रिय करण्याची प्रक्रिया स्पष्ट करण्यात आली आहे. जर ग्राहकाने पिन सेट केला, मोबाईल ॲपमधून सेटिंग्ज बदलल्या किंवा कस्टमर केअरमार्फत सक्रियतेस मान्यता दिली, तरच कार्ड अधिकृतपणे सुरू झाले असे मानले जाईल. अन्यथा, ठराविक दिवसांत कोणतीही कारवाई न झाल्यास बँकेने पुन्हा ग्राहकाची संमती घेणे आवश्यक आहे.
कंपनीच्या नावावर काढलेल्या कार्डांबाबतही नियम स्पष्ट करण्यात आले आहेत. अशा वेळी संबंधित मुख्य खातेधारकाची परवानगी आवश्यक असेल. तसेच ॲड-ऑन कार्डधारकांनाही काही अधिकार देण्यात आले असून, कार्ड हरवल्यास किंवा चोरीला गेल्यास ते स्वतः ते ब्लॉक करू शकतात.
व्याज आकारणीसंदर्भातही महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. पूर्वी काही बँका संपूर्ण बिलाच्या रकमेवर व्याज आकारत असत, जरी ग्राहकाने काही हिस्सा भरलेला असला तरी. आता मात्र फक्त थकीत रकमेवरच व्याज आकारले जाईल. उदाहरणार्थ, 10,000 रुपयांच्या बिलापैकी 2,000 रुपये भरले असतील, तर उर्वरित 8,000 रुपयांवरच व्याज लागू होईल. यामुळे ग्राहकांवर अनावश्यक आर्थिक ताण कमी होणार आहे.
हेही वाचा: Match-Day Economy: भारत-पाक सामन्याने मोडले रेकॉर्ड; जाहिरातदारांनी 10 सेकंदासाठी मोजले लाखो रुपये
या नव्या नियमांमुळे पारदर्शकता वाढणार असून ग्राहकांचे हक्क अधिक मजबूत होणार आहेत. बँकांच्या अटी व शर्तींमधील गुंतागुंती कमी करण्याचा आणि ग्राहकांना स्पष्ट माहिती देण्याचा उद्देश यामागे आहे.
जर तुमच्याकडे क्रेडिट कार्ड असेल किंवा घेण्याचा विचार करत असाल, तर हे नियम जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे. योग्य माहिती आणि जागरूकता यामुळे तुम्ही अनावश्यक शुल्क आणि व्याजापासून स्वतःचे संरक्षण करू शकता. RBIच्या या पावलामुळे लाखो ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे मानले जात आहे.