डिजिटल युगात बँकिंग व्यवहार सहज आणि जलद झाले असले तरी फसवणुकीचे प्रमाणही चिंताजनक वाढले आहे. ऑनलाईन लिंकवर क्लिक करणे, बनावट वेबसाईटवर माहिती टाकणे, अशा छोट्या चुका अनेकांना लाखोंचा फटका बसवतात. याच पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) ऑनलाईन फसवणूक रोखण्यासाठी महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. आता देशातील सर्व बँकांच्या अधिकृत वेबसाईट्समध्ये एक महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे, जो प्रत्येक ग्राहकाने जाणून घेणं गरजेचं आहे.
RBIचा नवा आदेश: सुरक्षित बँकिंगकडे मोठं पाऊल
या वर्षी 7 फेब्रुवारी 2025 रोजी आरबीआयनं एक परिपत्रक जारी करत सर्व बँकांना त्यांच्या संकेतस्थळांच्या डोमेनमध्ये बदल करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार, प्रत्येक बँकेनं आपली वेबसाईट bank.in या डोमेनवर नोंदवणं आवश्यक ठरवलं आहे. यामुळे, पूर्वी ज्या साइट्स .com किंवा इतर डोमेनवर होत्या, त्या आता .bank.in या सुरक्षित डोमेनवर स्थलांतरित होतील.
या निर्णयाचा उद्देश फिशिंग, हॅकिंग आणि ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार रोखणे हा आहे. आरबीआयनं सांगितलं की, या बदलामुळे डिजिटल बँकिंग सेवांबद्दल ग्राहकांचा विश्वास अधिक दृढ होईल आणि व्यवहार अधिक सुरक्षित होतील.
हेही वाचा: Unclaimed Money In India: देशभरात 80,000 कोटी रुपये बेवारस! कोणाचा आहे हा पैसा?
कोणत्या बँकांच्या साइट्समध्ये झाले बदल?
आता तुम्हाला तुमच्या बँकेचं नवं संकेतस्थळ लक्षात ठेवणं अत्यावश्यक आहे. उदाहरणार्थ –
SBI ची नवी साइट – https://sbi.bank.in
HDFC Bank – https://www.hdfc.bank.in
ICICI Bank – https://www.icici.bank.in
Axis Bank – https://www.axis.bank.in
Kotak Mahindra Bank – https://www.kotak.bank.in
PNB – https://pnb.bank.in
या नव्या बदलामुळे बँकांच्या अधिकृत आणि बनावट साइट्समध्ये फरक ओळखणं सोपं झालं आहे.
फसवणूक कशी टाळाल?
बनावट वेबसाईट्स अनेकदा बँकांच्या नावासारख्या दिसतात. उदा. sbi-bank.in, hdfc-india.in, अशा साइट्सवर क्लिक केल्यास तुमची माहिती चोरली जाऊ शकते. त्यामुळे,
वेबसाईट टाईप करताना शेवटचा भाग नेहमी तपासा तो .bank.in असलाच पाहिजे.
कुणालाही OTP, PIN किंवा खाते क्रमांक शेअर करू नका.
अनोळखी लिंक्सवर क्लिक करण्यापूर्वी विचार करा.
बँककडून आलेल्या ईमेल्सची स्पेलिंग आणि यूआरएल बारकाईने तपासा.
हे लहान पण महत्त्वाचे उपाय तुमचं खातं सुरक्षित ठेवतील.