महाराष्ट्रात सध्या MPSC पेपरफुटीप्रकरणी विद्यार्थ्यांचा आणि संघटनेचा उद्रेक पाहायला मिळाला. पुणे, कोल्हापूर आणि छत्रपती संभाजीनगर येथे रस्त्यावर उतरुन MPSC च्या विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं. रोहित पवारही MPSC विद्यार्थ्यांच्या मोर्चात सहभागी झाले होते. दरम्यान आज नवी मुंबईत संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी MPSC चे सचिव महेंद्र हरपाळकर यांच्या तोंडाला काळ फासलं.
MPSC पेपरफुटी प्रकरणी 3 ऑगस्ट रोजी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष अॅड. मनोज आखरे यांच्या नेतृत्वात राज्यभर तीव्र आंदोलने करण्यात आली होती. त्यावेळी प्रशासनाला स्पष्ट इशारा देऊनही सरकारने कोणतीही ठोस कारवाई केली नाही. प्रशासनाला वारंवार इशारा देऊनही कारवाई होत नसल्याने, संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला.
पेपर फुटीमध्ये MPSC मध्ये काम करणाऱ्या लोकांचा सहभाग असल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप असून MPSC चे अध्यक्ष आणि सचिव महेंद्र हरपाळकर यांचा राजीनामा घ्यावा अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे. याचपार्श्वभूमीवर संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी आज एमपीएससी सचिवांच्या तोंडाला काळं फासून एकप्रकारे त्यांच्या अध्यक्षांना इशारा दिला आहे. मुंबईतील या अचानक झालेल्या घटनेमुळे प्रशासकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली असून MPSC कार्यालयाबाहेर गदारोळाचे वातावरण निर्माण झाले आहे.