Sunday, November 16, 2025 06:32:33 PM

Silver Rate: धनत्रयोदशीच्या दिवशी चांदीच्या दरात लक्षणीय घट, आजचा दर काय?

धनत्रयोदशीच्या आधी दोन लाखांवर पोहोचलेल्या चांदीने काही दिवसात सोन्यापेक्षा जास्त उसळी घेतली. परंतु धनत्रयोदशीच्या आधी शुक्रवारी रात्री उशिरा चांदीत अचानक मोठी घसरण झाल्याने ग्राहकांना आनंद झाला आहे.

silver rate  धनत्रयोदशीच्या दिवशी चांदीच्या दरात लक्षणीय घट आजचा दर काय

जळगाव: धनत्रयोदशीच्या आधी दोन लाखांवर पोहोचलेल्या चांदीने काही दिवसात सोन्यापेक्षा जास्त उसळी घेतली. परंतु धनत्रयोदशीच्या आधी शुक्रवारी रात्री उशिरा चांदीत अचानक मोठी घसरण झाल्याने ग्राहकांना आनंद झाला आहे.

सोन्याच्या तुलनेत चांदीला थोडे कमी महत्व दिले जाते. मात्र आता चांदी भाव खाताना दिसून आली आहे. तशी चांदीची मागणी वाढण्यामागे अनेक कारणे आहेत. आजच्या आधुनिक काळात चांदीचे महत्त्व केवळ सजावटीपुरते मर्यादित राहिलेले नाही. इलेक्ट्रॉनिक्स, सोलर एनर्जी, इलेक्ट्रिक व हायब्रिड वाहने, औषध निर्मिती, कृत्रिम बुद्धिमत्तेसाठी लागणारे हार्डवेअर आणि 5 जी नेटवर्कसारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञान क्षेत्रांमध्ये चांदीचा मोठ्या प्रमाणात वापर होऊ लागला आहे.

हेही वाचा: Gold Rate Today : दिवाळीच्या पहिल्या दिवशीच सोनं इतकं महागलं, जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

जळगावच्या सुवर्ण बाजारपेठेतही दिवाळी जवळ आली असताना, चांदीची मोठी टंचाई जाणवली. 30 हजार रुपयांच्या प्रिमियमसह विकली जात असतानाही ग्राहकांकडून चांदीची मागणी कायम राहिली. मात्र, बाजारात चांदीचा पुरवठा मर्यादित असल्यामुळे विक्रेत्यांना ग्राहकांची मागणी पूर्ण करता आली नाही. दरम्यान दिवाळी आणि लग्नसराईच्या हंगामामुळे चांदीची पारंपरिक मागणी पुढील काही आठवड्यांतही कायम राहणार आहे. त्यामुळे पुरवठ्याची कमतरता आणि वाढती मागणी लक्षात घेता चांदीचे दर आगामी काळात अडीच लाखांपर्यंत जाण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली होती. जळगाव शहरातही धनत्रयोदशी तीन दिवसांवर असताना चांदीने जीएसटीसह सुमारे एक लाख 90 हजार 550 रूपयांचा ऐतिहासिक उच्चांक केला होता.

परंतु, दुसऱ्याच दिवशी गुरूवारी तब्बल 10 हजार 300 रूपयांची घट नोंदवली. एक लाख 80 हजार 250 रूपयांपर्यंत चांदीचे दर कमी झाले. त्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. प्रत्यक्षात शुक्रवारी दिवसभरात पुन्हा 1030 वाढ नोंदवली गेल्याने चांदीचे दर एक लाख 81 हजार 280 रूपयांपर्यंत पोहोचले आणि ग्राहकांची थोडीशी निराशाच झाली. मात्र, शुक्रवारी रात्री उशिरा बाजार बंद होईपर्यंत अचानक 11 हजार 330  रूपयांची घट नोंदवली गेली. त्यामुळे चांदी एक लाख 69 हजार 950 रूपयांपर्यंत घसरली. 15 तारखेला ऐतिहासिक झेप घेणाऱ्या चांदीच्या दरात चार दिवसातच तब्बल 20 हजार 600 रूपयांची घट झाली. चांदीच्या दरात लक्षणीय घट झाल्यानंतर धनत्रयोदशीला ग्राहकांना मनसोक्त चांदी खरेदी करता येणार आहे. 


सम्बन्धित सामग्री