आर्थिक अडचण कोणालाही, कधीही येऊ शकते. अशा वेळी तातडीने पैशांची गरज भासल्यास अनेकजण सोने किंवा चांदी गहाण ठेवण्याचा पर्याय निवडतात. मात्र चांदी गहाण ठेवण्यापूर्वी काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेणे अत्यंत गरजेचे आहे, अन्यथा भविष्यात अडचणी निर्माण होऊ शकतात.
सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे चांदी गहाण ठेवल्यावर तिच्या पूर्ण किमतीइतका कर्ज मिळत नाही. उदाहरणार्थ, जर तुमच्याकडे 50 हजार रुपयांची चांदी असेल, तरी तुम्हाला संपूर्ण 50 हजारांचे कर्ज मिळणार नाही. साधारणपणे बँका किंवा वित्तीय संस्था चांदीच्या किमतीच्या सुमारे 75 ते 85 टक्क्यांपर्यंतच कर्ज देतात. उर्वरित रक्कम ही सुरक्षिततेसाठी (सिक्युरिटी) राखून ठेवली जाते.
चांदी गहाण ठेवताना कोणत्या वस्तूंना प्राधान्य दिले जाते, हेही समजून घेणे आवश्यक आहे. चांदीचे दागिने आणि नाणी सहज स्वीकारले जातात, कारण त्यांची शुद्धता तपासणे सोपे असते आणि त्यांची बाजारातील किंमतही चांगली मिळते. मात्र चांदीची भांडी किंवा सजावटीच्या वस्तूंना अनेक वेळा बँका स्वीकारत नाहीत किंवा त्यांची किंमत कमी लावली जाते.
याशिवाय, चांदीच्या वस्तूंवर केलेली नक्षी किंवा डिझाइन यासाठी कोणतीही अतिरिक्त किंमत मिळत नाही. बँकांना केवळ चांदीची शुद्धता महत्त्वाची असते. त्यामुळे दागिन्यांवरील मेकिंग चार्ज किंवा कलाकुसरीचा लाभ कर्ज घेताना मिळत नाही, हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे.
अनेकांना वाटते की जास्त प्रमाणात चांदी गहाण ठेवल्यास मोठी रक्कम मिळेल, पण प्रत्यक्षात बँका प्रमाणापेक्षा गुणवत्तेला अधिक महत्त्व देतात. चांदीची किंमत ही प्रति ग्रॅम दरानुसार ठरते, त्यामुळे मोठे कर्ज हवे असल्यास अधिक प्रमाणात चांदी गहाण ठेवावी लागते.
तसेच प्रत्येक बँकेचे नियम आणि निकष वेगळे असतात. एका व्यक्तीकडून किती चांदी स्वीकारायची, कर्जाची मर्यादा किती ठेवायची, याबाबत बँकांचे स्वतंत्र धोरण असते. त्यामुळे चांदी गहाण ठेवण्यापूर्वी संबंधित संस्थेचे नियम नीट समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे.
एकूणच, आर्थिक अडचणीच्या वेळी चांदी गहाण ठेवणे हा एक पर्याय असला तरी तो विचारपूर्वक वापरणे गरजेचे आहे. योग्य माहिती आणि जागरूकता असल्यास तुम्ही अनावश्यक नुकसान टाळू शकता.