Pink Parking For Pregnant Women : भारतातील आयटी हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बंगळुरू शहरातून एक अत्यंत सकारात्मक आणि हृदयस्पर्शी बातमी समोर आली आहे. येथील एका नामांकित मॉलने गर्भवती महिलांसाठी ‘विशेष गुलाबी पार्किंग’ (Pink Parking) सुविधा सुरू केली आहे. या उपक्रमाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून, मॉल व्यवस्थापनावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
काय आहे ही खास संकल्पना?
बंगळुरूच्या ‘नेक्सस मॉल’मध्ये (Nexus Mall) हा अनोखा उपक्रम राबवण्यात आला आहे. सामान्यतः मॉल्समधील बेसमेंट पार्किंगमध्ये प्रचंड गर्दी आणि गोंधळ असतो, जो गर्भवती महिलांसाठी गैरसोयीचा ठरू शकतो. ही अडचण ओळखून मॉल प्रशासनाने खास गर्भवती महिलांसाठी राखीव पार्किंग लॉट तयार केला आहे. या जागेला आकर्षक गुलाबी रंगात डिझाइन करण्यात आले असून तिथे तशा प्रकारचे स्पष्ट फलकही लावण्यात आले आहेत, जेणेकरून ही जागा दुरूनही सहज ओळखता येईल.
सोशल मीडियावर कौतुकाची लाट
दरम्यान, @moniakshaylove12 या इंस्टाग्राम हँडलवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये एक व्यक्ती या कल्पनेचे कौतुक करताना दिसत आहे. त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, “महिलांसाठी, विशेषतः गर्भवती महिलांसाठी वेगळी जागा राखून ठेवल्याबद्दल बंगळुरूमधील नेक्सस मॉलला सलाम. भारतातील सर्व मॉल्सनीही याचे अनुकरण करायला हवे.”
नेटीझन्सच्या प्रतिक्रिया
हा व्हिडीओ व्हायरल होताच देशभरातील वापरकर्त्यांनी त्यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. “ही एक अत्यंत आवश्यक सुविधा आहे,” असे एका वापरकर्त्याने म्हटले आहे. दुसऱ्या एका युजरने याला “हृदयस्पर्शी संकल्पना” म्हणून संबोधले आहे. अनेकांनी सार्वजनिक ठिकाणे अधिक समावेशक आणि संवेदनशील बनवण्यासाठी अशा छोट्या पण महत्त्वपूर्ण बदलांची गरज असल्याचे मत व्यक्त केले. बंगळुरूच्या या ‘गुलाबी पार्किंग’ मॉडेलमुळे आता देशातील इतर मोठ्या शहरांमधील मॉल्समध्येही अशा सुविधा सुरू होण्याची मागणी जोर धरू लागली आहे.