Police Constable Exam: नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट (NEET) च्या गोंधळानंतर आता महाराष्ट्रातील पोलीस भरती प्रक्रियेबाबत एक अत्यंत महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. राज्य पोलीस दलातील शिपाई पदासाठीची रद्द करण्यात आलेली लेखी परीक्षा आता पुन्हा एकदा घेतली जाणार आहे. मूळ प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांवरून निर्माण झालेल्या मोठ्या वादानंतर प्रशासनाने हा महत्त्वाचा निर्णय घेतला असून, येत्या 24 मे 2026 रोजी ही परीक्षा नव्याने घेतली जाईल, अशी माहिती पोलीस दलातील वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे.
खासगी पुस्तकातून 'जसेच्या तसे' प्रश्न आल्याने झाला होता वाद
दरम्यान, 2 मे 2026 रोजी झालेल्या लेखी परीक्षेत विचारण्यात आलेले बहुतांश प्रश्न हे एका खासगी प्रकाशकाच्या 'पोलीस भरती प्रश्नपत्रिका सराव प्रश्नसंच 10' या पुस्तकातून घेण्यात आल्याचा आक्षेप घेण्यात आला होता. 100 गुणांच्या या संपूर्ण पेपरमध्ये तब्बल 85 प्रश्न वेगवेगळ्या सराव संचांमधून जसेच्या तसे कॉपी केल्याचा आरोप उमेदवारांनी केला होता.
चौकशीअंती परीक्षा रद्द करण्याचा निर्णय
एका खासगी प्रकाशनाच्या पुस्तकातील प्रश्न जसेच्या तसे सरकारी परीक्षेत आल्यामुळे संपूर्ण प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. यामुळे राज्यभरातील तरुण आणि विविध विद्यार्थी संघटनांनी तीव्र संताप व्यक्त केला होता. या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत पुणे येथील राज्य राखीव पोलीस बलाच्या (SRPF) पोलीस उपमहानिरीक्षकांनी 4 मे रोजी या प्रकरणाच्या सखोल चौकशीचे आदेश दिले होते आणि तोपर्यंत भरतीला स्थगिती दिली होती.
विद्यार्थ्यांना दिलासा
अखेर या वादावर अंतिम निर्णय घेत अप्पर पोलीस महासंचालकांनी ती वादग्रस्त परीक्षा पूर्णपणे रद्दबातल ठरवली आहे. आता प्रशासनाने उमेदवारांचे नुकसान टाळण्यासाठी तातडीने पावले उचलली असून, 24 मे रोजी ही लेखी परीक्षा पुन्हा घेतली जाणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या परीक्षार्थींना मोठा दिलासा मिळाला आहे.