India's First AI Clinic: ग्रेटर नोएडा येथील शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत (GIMS) भारतातील पहिल्या 'आर्टिफिशियल इंटेलिजन्स' (AI) क्लिनिकचे उद्घाटन करण्यात आले आहे. वैद्यकीय तपासणीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करणारे हे देशातील पहिलेच सरकारी केंद्र असून, यामुळे ग्रामीण आणि दुर्गम भागातील रुग्णांना जागतिक दर्जाच्या आरोग्य सुविधा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. हे क्लिनिक प्रगत अल्गोरिदम आणि ऑटोमेशनच्या मदतीने रुग्णांच्या लक्षणांचे रिअल-टाइम विश्लेषण करते. रक्ताचे नमुने, जेनेटिक डेटा आणि विविध स्कॅनिंग अहवालांचे विश्लेषण करण्यासाठी येथे AI टूल्सचा वापर केला जातो. एक्स-रे, अल्ट्रासाऊंड, सीटी स्कॅन आणि एमआरआय (MRI) रिपोर्टमधील सूक्ष्म बदल हे क्लिनिक टिपू शकते. तसेच या क्लिनिकमध्ये अनुवांशिक माहितीचा वापर करून भविष्यात होऊ शकणाऱ्या आजारांचा अंदाज वर्तवणे शक्य होणार आहे.
AI क्लिनिकचे प्रमुख फायदे
AI क्लिनिकमुळे कॅन्सरचे लवकर निदान होईल. फुफ्फुसातील किंवा स्तनातील गाठी ज्या मानवी डोळ्यांना सहजासहजी दिसत नाहीत, त्या AI मुळे सुरुवातीच्या टप्प्यातच ओळखता येतील. या क्लिनिकमुळे डॉक्टरांची कार्यक्षमता वाढणार आहे. रेडिओलॉजिस्टची कार्यक्षमता 40 टक्क्यांनी वाढणार असून, यामुळे रुग्णांना तासनतास रिपोर्टची वाट पाहावी लागणार नाही.
याशिवाय, वेअरेबल उपकरणांच्या (Smart Devices) मदतीने रुग्णाचे हृदय ठोके आणि रक्तदाब यावर सतत लक्ष ठेवले जाईल, ज्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत त्वरित अलर्ट मिळेल. चुकीचे निदान (False Positive) होण्याचे प्रमाण या तंत्रज्ञानामुळे लक्षणीयरीत्या कमी होईल. तसेच यामुळे किडनी आणि यकृताच्या आजारांवर नियंत्रण ठेवणे शक्य होईल. किडनी आणि लिव्हरशी संबंधित गंभीर समस्यांचे वेळीच मूल्यांकन करून उपचार सुरू करता येतील. हे क्लिनिक केवळ उपचार करत नाही, तर आरोग्य क्षेत्रातील स्टार्टअप्ससाठी नवीन संधी उपलब्ध करून देईल. यामुळे ग्रामीण भारतातील आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम होईल, असं GIMS चे संचालक डॉ. राकेशकुमार गुप्ता यांनी म्हटलं आहे.