Dog Photo On Hall Ticket: सरकारी भरती प्रक्रियेतील ढसाळ कारभाराचा एक संतापजनक नमुना बिहारच्या रोहतास जिल्ह्यात समोर आला आहे. येथील एका उमेदवाराने परीक्षेसाठी आपले हॉल तिकीट डाऊनलोड केले असता, त्यावर स्वतःच्या फोटोऐवजी एका कुत्र्याचा फोटो पाहून त्याला मोठा धक्का बसला. या विचित्र प्रकारामुळे प्रशासनाच्या ऑनलाइन यंत्रणेवर आता मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
नेमकं प्रकरण काय?
हे प्रकरण रोहतास जिल्ह्यातील बिक्रमगंज येथील रहिवासी रितेश कुमार यांच्याशी संबंधित आहे. रितेशने 2022 मध्ये दिवाणी न्यायालयात (Civil Court) शिपाई पदासाठी अर्ज केला होता. तब्बल चार वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर, 2026 मध्ये या परीक्षेचे हॉल तिकीट जारी करण्यात आले. मात्र, रितेशने जेव्हा आपले ओळखपत्र पाहिले, तेव्हा त्यावरील नाव आणि पत्ता बरोबर होता, पण फोटोच्या जागी एका कुत्र्याचा फोटो छापून आला होता. हा प्रकार पाहून रितेश पुरता अस्वस्थ झाला आहे.
15 मार्चला परीक्षा; उमेदवार चिंतेत
दिवाणी न्यायालयातील शिपाई पदाची ही लेखी परीक्षा 15 मार्च रोजी होणार असून, रितेशचे परीक्षा केंद्र सहरसा जिल्ह्यात आहे. परीक्षेला अवघे काही दिवस उरले असताना प्रवेशपत्रावर असा गंभीर बदल झाल्याने त्याला परीक्षा केंद्रावर प्रवेश नाकारला जाण्याची भीती वाटत आहे. "मी चार वर्षांपासून या परीक्षेची वाट पाहत होतो आणि आता माझ्या जागी कुत्र्याचा फोटो लावण्यात आला आहे, हे पाहून मी स्तब्ध झालो," अशी भावना रितेशने व्यक्त केली आहे.
हेही वाचा – Russian model video : छेड काढणाऱ्याला जाग्यावरच दिला चोप! रील शूट करताना अचानक जवळ येऊन.. व्हिडिओ व्हायरल
प्रशासकीय यंत्रणेचा गलथान कारभार
बिहारमध्ये अशा प्रकारची ही पहिलीच घटना नाही. यापूर्वीही जात प्रमाणपत्र, उत्पन्न दाखले किंवा इतर सरकारी कागदपत्रांवर उमेदवारांच्या जागी प्राण्यांचे किंवा सेलिब्रिटींचे फोटो आल्याचे प्रकार घडले आहेत. रितेश कुमारने आता याप्रकरणी संबंधित भरती मंडळाकडे तक्रार केली असून, ही त्रुटी तातडीने दुरुस्त करून नवीन हॉल तिकीट देण्याची मागणी केली आहे. जर ही चूक वेळेत दुरुस्त झाली नाही, तर उमेदवाराचे चार वर्षांचे कष्ट वाया जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासन यावर काय पाऊल उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.