Mobile Battery Blast: स्मार्टफोन ही आजच्या काळातील गरज असली तरी, त्यातील बॅटरीबाबत केलेली थोडीशी निष्काळजी जीवावर बेतू शकते. मध्य प्रदेशातील रेवा जिल्ह्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. येथे जुन्या मोबाईलच्या बॅटरीशी खेळत असताना अचानक झालेल्या स्फोटामुळे एका मुलाचा अंगठा कापला गेला, तर त्याच्या चार बोटांना गंभीर दुखापत झाली आहे. ही घटना जुन्या फोनच्या बॅटरी किती घातक ठरू शकतात, याचा जिवंत पुरावा आहे.
जुनी आणि फुगलेली बॅटरी म्हणजे 'चालता-फिरता बॉम्ब'
स्मार्टफोनच्या बॅटरी कालांतराने खराब होतात किंवा फुगतात. अनेकदा युजर्स बॅटरीच्या फुगवण्याकडे दुर्लक्ष करतात, परंतु अशा बॅटरी स्फोटासाठी अत्यंत संवेदनशील असतात. बॅटरी जास्त गरम होणे किंवा त्यात अंतर्गत बिघाड होणे यामुळे शॉर्ट सर्किट होऊन घरात आग लागण्याचा किंवा स्फोट होण्याचा धोका वाढतो. याव्यतिरिक्त, जुन्या बॅटरीमधून रसायने गळू शकतात, जी त्वचा किंवा डोळ्यांच्या संपर्कात आल्यास गंभीर इजा पोहचवू शकतात.
लिथियम-आयन तंत्रज्ञान आणि स्फोटाचे कारण
आजच्या काळात बहुतांश फोनमध्ये लिथियम-आयन बॅटरी वापरली जाते. या बॅटरीमध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह इलेक्ट्रोड असतात, जे एका अत्यंत पातळ 'सेपरेटर फिल्म'ने वेगळे केलेले असतात. जेव्हा या बॅटरीवर दाब दिला जातो, ती चावली जाते किंवा तीक्ष्ण वस्तूने टोचली जाते, तेव्हा ही फिल्म फाटते. यामुळे दोन्ही इलेक्ट्रोड एकमेकांच्या संपर्कात येतात आणि भीषण रासायनिक प्रक्रिया होऊन बॅटरीचा स्फोट होतो.
अपघात टाळण्यासाठी काय करावे?
छेडछाड टाळा: बॅटरी उघडण्याचा, दाबण्याचा किंवा तीक्ष्ण वस्तूने टोचण्याचा प्रयत्न कधीही करू नका.
सुरक्षित विल्हेवाट: जुना फोन किंवा खराब झालेली बॅटरी घरात साठवून ठेवण्यापेक्षा ती ई-कचरा (E-waste) संकलन केंद्रात द्या किंवा अधिकृत कंपनीला विकून टाका.
उन्हापासून बचाव: बॅटरी कधीही थेट उन्हात किंवा उष्ण ठिकाणी ठेवू नका, कारण उष्णतेमुळे बॅटरीतील रसायने सक्रिय होऊन स्फोट होऊ शकतो.
मुलांपासून दूर ठेवा: जुने मोबाईल किंवा सुट्या बॅटरी मुलांना खेळण्यासाठी देऊ नका.