Railway Fine: भारतीय रेल्वेने नियम मोडणाऱ्या प्रवाशांविरुद्ध कंबर कसली असून, चालू आर्थिक वर्षात दंडात्मक कारवाईचा मोठा आकडा समोर आला आहे. रेल्वे प्रवासी जाणूनबुजून किंवा अजाणतेपणे अनेक नियम मोडतात हे सामान्य आहे. भारतीय रेल्वे हे नियम जाणूनबुजून उल्लंघन करणाऱ्या प्रवाशांवर सतत कठोर कारवाई करत आहे. पश्चिम रेल्वेने (Western Railway) 1 एप्रिल ते 31 डिसेंबर या 9 महिन्यांच्या कालावधीत विना तिकीट आणि अनियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून तब्बल 155.46 कोटी रुपयांचा दंड वसूल केला आहे.
गेल्या वर्षाच्या तुलनेत 49 टक्के वाढ
पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, यावर्षी वसूल करण्यात आलेला दंड हा मागील आर्थिक वर्षाच्या याच कालावधीच्या तुलनेत 49 टक्क्यांनी जास्त आहे. या एकूण दंडामध्ये मुंबई उपनगरीय (लोकल) विभागातून वसूल करण्यात आलेल्या 41.26 कोटी रुपयांचा समावेश आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली राबवण्यात आलेल्या विशेष तिकीट तपासणी मोहिमांमुळे हा आकडा वाढल्याचे सांगितले जात आहे.
केवळ डिसेंबर महिन्यात 15 कोटींची वसुली
पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, केवळ डिसेंबर महिन्यात 2.51 लाख विना तिकीट किंवा अनियमित प्रवाशांवर कारवाई करण्यात आली. या प्रवाशांकडून 15.54 कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला, जो डिसेंबर 2024 च्या तुलनेत 42 टक्क्यांनी अधिक आहे. यामध्ये विना तिकीट प्रवाशांसह बुक न केलेले सामान वाहून नेणाऱ्यांचाही समावेश आहे.
हेही वाचा – रस्त्यावर 'चांदीच चांदी!' हायवेवर प्रवाशांची ही झुंबड आणि.. सत्य जाणून पोलीसही चक्रावले
एसी लोकलमध्येही कारवाईचा धडाका
दरम्यान, एसी लोकल गाड्यांमधील अनधिकृत प्रवेश रोखण्यासाठी रेल्वेने विशेष मोहीम राबवली आहे. एप्रिल ते डिसेंबर 2025 पर्यंत अंदाजे 91,000 अनधिकृत प्रवासी आढळले. या प्रवाशांकडून 2.97 कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. हा दंड गेल्या वर्षाच्या तुलनेत तब्बल 97 टक्क्यांनी जास्त आहे. विना तिकीट प्रवास करणे हा कायदेशीर गुन्हा असून, प्रवाशांनी नेहमी वैध तिकीट घेऊनच प्रवास करावा, असे आवाहन पश्चिम रेल्वेने केले आहे.