Safeguard Whatsapp Account from Hackers : आजच्या वेगाने बदलणाऱ्या डिजिटल युगात ऑनलाईन स्कॅमचा धोका कमालीचा वाढला आहे. सायबर गुन्हेगार सर्वसामान्य युझर्सला आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी रोज नवनवीन क्लृप्त्या शोधत असतात. यामध्ये केवायसी (KYC) अपडेट करण्याच्या बहाण्यापासून ते थेट डिजिटल अरेस्ट (Digital Arrest) करण्यापर्यंतच्या अत्यंत धक्कादायक पद्धतींचा वापर केला जातो. या सर्व फसवणुकीत लोकांची कष्टाची कमाई एका क्षणात लुटली जाते. भारतात सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या व्हॉट्सॲपचा वापर करूनही हे स्कॅमर्स लोकांना टार्गेट करतात. हीच बाब लक्षात घेऊन व्हॉट्सॲपने युझर्सच्या सुरक्षेसाठी काही अत्यंत प्रभावी सुरक्षा फीचर्स दिले आहेत, ज्यांचा वापर करून तुम्ही सायबर फसवणुकीपासून स्वतःचा बचाव करू शकता.
अनोळखी कॉल्स आणि मेसेजेसपासून सुटका
व्हॉट्सॲप वापरताना अनेकदा अनोळखी आंतरराष्ट्रीय किंवा इतर नंबरवरून वारंवार कॉल्स येऊन आपल्याला त्रास होतो. या त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी आणि सुरक्षित राहण्यासाठी खालील फीचर्स अत्यंत महत्त्वाचे ठरतात:
Silence Unknown Callers: जर तुम्हाला अनोळखी नंबरवरून येणाऱ्या कॉल्सचा त्रास होत असेल, तर हे फीचर तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. हे ऑन केल्यावर अनोळखी नंबरवरून येणारे कॉल्स आपोआप सायलेंट होतात. हे कॉल्स तुमच्या फोनवर वाजणार नाहीत, मात्र तुम्हाला ते कॉल टॅब आणि नोटिफिकेशनमध्ये नक्कीच पाहायला मिळतील.
Context Cards: कोणत्याही नवीन किंवा अनोळखी कॉन्टॅक्टकडून मेसेज आल्यास त्या नंबरविषयीची अतिरिक्त माहिती हे फीचर पुरवते. हा नंबर तुमच्या फोनमध्ये सेव्ह आहे की नाही, किंवा तुम्ही आणि तो नंबर एकाच कोणत्या ग्रुपमध्ये आहात का, याची माहिती या कार्ड्सद्वारे मिळते. यामुळे समोरच्या व्यक्तीला उत्तर द्यायचे की थेट ब्लॉक करायचे, याचा योग्य निर्णय घेणे युझर्सना सोपे जाते.
स्क्रीन शेअरिंग आणि अकाउंट हॅकिंगपासून बचाव
अनेकदा स्कॅमर्स युझर्सला कॉलवर घेऊन त्यांचे बँक डिटेल्स किंवा वैयक्तिक माहिती चोरण्याचा प्रयत्न करतात. या प्रकारांना आळा घालण्यासाठी व्हॉट्सॲपने सुरक्षेचे अधिक कडक स्तर जोडले आहेत:
Screenshare Warning: व्हॉट्सॲपवर व्हिडिओ कॉलदरम्यान स्क्रीन शेअर करण्याची सुविधा मिळते. हे फीचर अधिकृत कामासाठी सोयीचे असले तरी स्कॅमर्स याचा गैरवापर करून तुमची खाजगी माहिती चोरू शकतात. म्हणूनच, आता अनोळखी व्यक्तीसोबत स्क्रीन शेअर करताना व्हॉट्सॲप युझरला संभाव्य धोक्याचा इशारा देणारा स्क्रीनशेअर वॉर्निंग अलर्ट दाखवतो.
Device Linking Alerts: भामटे अनेकदा युझर्सचा विश्वास संपादन करून त्यांचे व्हॉट्सॲप अकाउंट इतर उपकरणांशी (devices) लिंक करण्याचा प्रयत्न करतात. असे झाल्यास तुमचे संपूर्ण चॅट्स त्यांच्या ताब्यात जाऊ शकतात. यापासून संरक्षण मिळवण्यासाठी व्हॉट्सॲप आता कोणतीही संशयास्पद लिंकिंग रिक्वेस्ट आल्यास तात्काळ वॉर्निंग अलर्ट पाठवून युझरला सावध करतो.
हेही वाचा – Smartphone Tips: मोबाईल पाण्यात पडलाय? 'ही' चूक अजिबात करू नका; 'या' सोप्या टिप्स वाचवतील तुमचा स्मार्टफोन
सुरक्षेचा सर्वात मजबूत भिंत: टू-स्टेप व्हेरिफिकेशन
ऑनलाईन सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक असणारे फीचर म्हणजे 'टू-स्टेप व्हेरिफिकेशन' (Two-step Verification) होय. या फीचरच्या मदतीने तुमच्या व्हॉट्सॲप अकाउंटला सुरक्षेचे अतिरिक्त कवच मिळते. यामध्ये तुमचे अकाउंट रिसेट किंवा पुन्हा व्हेरिफाय करायचे असल्यास केवळ साध्या पासवर्डने काम चालत नाही, तर त्यासाठी अतिरिक्त सुरक्षित व्हेरिफिकेशन प्रक्रियेमधून जावे लागते. यामुळे जर एखाद्या व्यक्तीकडे तुमचा पासवर्ड गेला, तरीही ते तुमचे अकाउंट हॅक करू शकत नाहीत.
अकाउंट सुरक्षित ठेवणे आता तुमच्या हातात
जगभरातील कोट्यवधी लोक व्हॉट्सॲपचा वापर दैनंदिन संवादासाठी करतात. साहजिकच, जिथे गर्दी जास्त तिथे स्कॅमर्सचा वावरही वाढतो. व्हॉट्सॲपने दिलेले हे सुरक्षा फीचर्स अत्यंत प्रगत असून ते तुम्हाला सुरक्षित ठेवण्यासाठीच डिझाइन केलेले आहेत. जर तुम्ही अद्याप या सेटिंग्स ऑन केल्या नसतील, तर आजच आपल्या व्हॉट्सॲपच्या सेटिंगमध्ये जाऊन या गोष्टी चालू करा आणि कोणत्याही टेन्शनशिवाय सुरक्षितपणे चॅटिंगचा आनंद घ्या.