Tuesday, February 17, 2026 09:06:36 AM

WhatsApp Paid Version: आता व्हॉट्सॲप वापरण्यासाठी पैसे मोजावे लागणार? नेमका काय आहे सबस्क्रिप्शन प्लॅन? जाणून घ्या

व्हॉट्सॲपसाठी मेटा कंपनी सबस्क्रिप्शन प्लॅन आणण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे.

whatsapp paid version आता व्हॉट्सॲप वापरण्यासाठी पैसे मोजावे लागणार नेमका काय आहे सबस्क्रिप्शन प्लॅन जाणून घ्या

WhatsApp Paid Version: व्हॉट्सॲप वापरणाऱ्यांसाठी एक मोठी आणि धक्कादायक अपडेट समोर येत आहे. आतापर्यंत मोफत मेसेजिंगसाठी ओळखले जाणारे व्हॉट्सॲप भविष्यात पेड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मेटा कंपनीकडून व्हॉट्सॲपसाठी सबस्क्रिप्शन मॉडेल आणण्याच्या हालचाली सुरू असल्याच्या चर्चेला सोशल मीडियावर जोर आला आहे. त्यामुळे भारतासह जगभरातील कोट्यवधी युजर्समध्ये उत्सुकता आणि संभ्रम दोन्ही वाढले आहेत.

सध्या उपलब्ध माहितीनुसार, हा संभाव्य पेड प्लॅन सर्वसामान्य युजर्ससाठी तात्काळ लागू होणार नाही. मेटा कंपनीचा फोकस प्रामुख्याने व्हॉट्सॲप बिझनेस युजर्सवर असल्याचे सांगितले जात आहे. व्यवसायिक वापरकर्त्यांना अधिक प्रगत फीचर्स, अतिरिक्त डिव्हाइस कनेक्शन, ग्राहक व्यवस्थापनासाठी विशेष टूल्स आणि डेटा अ‍ॅनालिटिक्ससारख्या सुविधा देण्यासाठी शुल्क आकारले जाऊ शकते. त्यामुळे लहान-मोठ्या व्यवसायांसाठी व्हॉट्सॲप वापरणे आता खर्चिक ठरू शकते.

तथापि, भविष्यात सामान्य युजर्ससाठीही प्रिमियम पर्याय उपलब्ध होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्या व्हॉट्सॲपवरील बेसिक मेसेजिंग, कॉलिंग आणि मीडिया शेअरिंग मोफतच राहण्याची शक्यता आहे. मात्र जाहिरातीमुक्त अनुभव हवा असल्यास युजर्सना सबस्क्रिप्शन घ्यावे लागू शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

गेल्या काही काळात मेटाने व्हॉट्सॲप स्टेटस आणि चॅनेलमध्ये जाहिराती दाखवण्यास सुरुवात केली होती. युजर्सकडून मोठ्या प्रमाणावर विरोध झाला असतानाही मेटाने हा निर्णय मागे घेतला नाही. त्यामुळेच आता कंपनी जाहिरातमुक्त अनुभवासाठी पेड पर्याय देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. व्हॉट्सॲपच्या काही बीटा व्हर्जनमध्ये जाहिराती आणि सबस्क्रिप्शनशी संबंधित संकेत आढळल्यामुळे या चर्चांना आणखी बळ मिळाले आहे.

पेड व्हॉट्सॲप प्लॅनची किंमत किती असेल, याबाबत मात्र सध्या कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मेटाकडून अद्याप यासंबंधी अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र रिपोर्ट्सनुसार, एक्स (पूर्वीचे ट्विटर) प्रमाणे मासिक आणि वार्षिक सबस्क्रिप्शन प्लॅन उपलब्ध होऊ शकतात. सुरुवातीला बिझनेस युजर्ससाठी पेड सेवा सुरू केली जाईल आणि त्यानंतर टप्प्याटप्प्याने सर्वसामान्य युजर्ससाठीही प्रिमियम पर्याय सादर केला जाऊ शकतो.

जर हा निर्णय प्रत्यक्षात आला, तर तो व्हॉट्सॲपच्या आतापर्यंतच्या धोरणात मोठा बदल ठरेल. “साधं, सुरक्षित आणि मोफत” ही ओळख असलेल्या व्हॉट्सॲपसाठी हा एक नवा टप्पा असणार आहे. त्यामुळे येत्या काळात मेटा कंपनी याबाबत काय अधिकृत घोषणा करते, याकडे जगभरातील युजर्सचे लक्ष लागले आहे.


सम्बन्धित सामग्री