Coaching Center Fire: उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ येथून एक अत्यंत हृदयद्रावक बातमी समोर आली आहे. अलीगंज परिसरातील एका अॅनिमेशन कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये लागलेल्या भीषण आगीत आतापर्यंत 14 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, यामध्ये बहुतांश विद्यार्थ्यांचा समावेश आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक यांनी या धक्कादायक आकडेवारीला दुजोरा दिला आहे. घटनास्थळाची पाहणी करताना उपमुख्यमंत्री स्वतः कमालीचे भावूक झाले होते. त्यांनी सांगितले की, हे एक अॅनिमेशन प्रशिक्षण केंद्र होते, जिथे अंदाजे 16-17 वर्षे वयोगटातील मुले कार्टून मेकिंग आणि अॅनिमेशन शिकण्यासाठी येत असतं. मी स्वतः माझ्या डोळ्यांनी 14 मृतदेह पाहिले आहेत, असंही त्यांनी यावेळी भावूक होऊन सांगितलं.
दाट धुरामुळे अडचणी; 13 मुलांना वाचवण्यात यश
उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक यांनी दिलेल्या माहितीनुसार, बचाव पथकाने युद्धपातळीवर प्रयत्न करून 13 मुलांना सुरक्षित बाहेर काढले असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले आहे. इमारतीमध्ये मोठ्या प्रमाणात लाकडी फर्निचर असल्यामुळे आग वेगाने पसरली आणि संपूर्ण परिसरात काळोखासारखा दाट धूर साचला. या धुरामुळे मदतकार्यात सुरुवातीला प्रचंड अडथळे आले. सध्या अग्निशमन दलाच्या जवानांसह एनडीआरएफचे (NDRF) पथकही घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्य वेगाने पूर्ण केले जात आहे. आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.
Lucknow, Uttar Pradesh: Deputy Chief Minister Brajesh Pathak interacts with Parijot Singh, the father of a student injured in the coaching centre fire incident. (More details are awaited) pic.twitter.com/vezJNM2AnH — IANS (@ians_india) June 22, 2026
जखमींवर केजीएमयू (KGMU) ट्रॉमा सेंटरमध्ये उपचार सुरू
दुर्घटना घडल्यानंतर तातडीने परिस्थिती हाताळण्यासाठी घटनास्थळी 6 रुग्णवाहिका तैनात ठेवण्यात आल्या आहेत. सर्व जखमींना किंग जॉर्ज मेडिकल युनिव्हर्सिटीच्या (KGMU) ट्रॉमा सेंटरमध्ये उपचारासाठी हलवण्यात आले आहे. केजीएमयूचे प्रवक्ते डॉ. के. के. सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, रुग्णालयात 7 जणांना आणण्यात आले होते. यापैकी 2 विद्यार्थ्यांना किरकोळ दुखापत झाली असून ते पूर्णपणे धोक्याबाहेर आहेत. तर इतर 2 विद्यार्थ्यांची हाडे मोडली (फ्रॅक्चर) असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे.
पंतप्रधान मोदी यांनी या घटनेवर तीव्र शब्दांत दु:ख व्यक्त केलं आहे. त्यांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटलं आहे की, ‘उत्तर प्रदेशातील लखनौ येथे आगीच्या दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीमुळे मला अत्यंत दुःख झाले आहे. शोकाकुल कुटुंबीयांच्या दुःखात मी सहभागी आहे. जखमी लवकरात लवकर बरे होवोत, अशी मी प्रार्थना करतो. बचावकार्य सुरू असून प्रशासन सर्वतोपरी मदत करत आहे. या दुर्घटनेत प्राण गमावलेल्यांच्या निकटवर्तीयांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून (PMNRF) प्रत्येकी 2 लाख रुपयांची मदत दिली जाईल. तसेच, जखमींना 50,000 रुपयांची मदत दिली जाईल.’
Anguished by the loss of lives in a fire mishap in Lucknow, Uttar Pradesh. My condolences to the bereaved families. May the injured recover at the earliest. Rescue operations are underway and authorities are providing all possible assistance. An ex-gratia of Rs. 2 lakh from… — PMO India (@PMOIndia) June 22, 2026
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडून तीव्र शोक; चौकशीसाठी डीजीपी घटनास्थळी
या भीषण आणि दुःखद दुर्घटनेवर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. “आगीच्या घटनेत निष्पाप मुले बाधित झाली असून काहींचा मृत्यू होणे अत्यंत वेदनादायी आहे,” अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना मांडल्या. मुख्यमंत्र्यांनी तात्काळ लखनऊला रवाना होण्याची घोषणा केली असून पीडित कुटुंबांना न्याय देण्याचे आणि दोषींवर कडक कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यांनी उत्तर प्रदेशचे पोलीस महासंचालक (DGP) आणि गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव यांना तात्काळ घटनास्थळी भेट देऊन सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
हेही वाचा – Coaching Center Fire: कोचिंग सेंटरला भीषण आग; जीव वाचवण्यासाठी विद्यार्थ्यांच्या इमारतीवरून उड्या
संपूर्ण परिसर सील; भविष्यातील दुर्घटना रोखण्यासाठी कडक पावले
मुख्यमंत्री योगी यांनी या संपूर्ण प्रकरणाच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. गृह विभागाचे प्रधान सचिव आणि डीजीपी यांना केवळ आगीच्या कारणांचा शोध घेण्याचेच नव्हे, तर भविष्यात अशा निवासी किंवा व्यावसायिक इमारतींमध्ये अशा दुर्घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी ठोस नियमावली आणि उपाययोजना तयार करण्याचे कडक निर्देश देण्यात आले आहेत. सुरक्षेचा उपाय म्हणून प्रशासनाने सध्या हा संपूर्ण परिसर सील केला असून तपास यंत्रणा आगीच्या मूळ कारणाचा शोध घेत आहेत.