काही वेळा कौटुंबिक अडचणी, आर्थिक जबाबदाऱ्या आणि वाढता मानसिक ताण यांचा एकत्रित परिणाम व्यक्तीच्या आयुष्यावर गंभीर परिणाम करु शकतो. नोएडामधील एका तरुण सॉफ्टवेअर इंजिनिअरच्या मृत्यूच्या घटनेनंतर अशाच अनेक प्रश्नांनी पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे.
काय घडलं नेमकं?
दिल्ली-एनसीआरमधील उंच इमारतीपैंकी एक असलेल्या सुपरनोव्हाच्या 43 व्या मजल्यावरुन उडी घेत 28 वर्षीय संभव जैन याने शनिवारी दुपारी जीवन संपवल्याची माहिती आहे. संभव हा गुरुग्राममधील मानेसरचा रहिवासी होता.
पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, संभव गेल्या काही काळापासून मानसिक तणावात होता. 2024 मध्ये त्याचं लग्न झालं होतं. त्यानंतर 2025 मध्ये त्याला एक मुलगाही झाला. मात्र, मुलाचा जन्म सातव्या महिन्यात झाल्यामुळे त्याच्यावर दीर्घकाळासाठी उपचार हे सुरु झाले होते. कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, या उपचारांवर आतापर्यंत साधारण 40 लाख खर्च झाला होता.
दरम्यान, संभव आणि त्याच्या पत्नीमध्येही कौटुंबिक वाद निर्माण झाले आणि पत्नीने घटस्फोटासाठी न्यायालयात दावा दाखल केला होता. त्या चर्चेनंतर तडजोडीसाठी 15 लाख रुपयांची रक्कम निश्चित झाली होती. सोशल मीडियावर तर 3 कोटी रुपयांच्या पोटगीबाबत चर्चा होती. मात्र, पोलिसांना हा दावा चुकीचा असल्याचं सांगितलं आहे.
संभववर अन्य कर्जांचाही ताण होता. आत्महत्येच्या काही दिवसांआधी त्याने वडिलांशी नैराश्य आणि आत्महत्येच्या विचारांबाबतही चॅट केल्याची माहिती समोर आलेली असून पोलिस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.