Sunday, March 08, 2026 10:43:46 PM

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी 'आनंदाची बातमी'; आठव्या वेतन आयोगाची प्रश्नावली प्रसिद्ध; 'या' प्रश्नांची उत्तरे द्या आणि पगारवाढ मिळवा?

फिटमेंट फॅक्टरसह वेतन रचनेवर कर्मचाऱ्यांची मते मागवण्यात आली आहेत.

8th pay commission केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आठव्या वेतन आयोगाची प्रश्नावली प्रसिद्ध या प्रश्नांची उत्तरे द्या आणि पगारवाढ मिळवा

नवी दिल्ली: केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या आणि पेन्शनधारकांच्या दृष्टीने अत्यंत दिलासादायक आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारने आता आठव्या वेतन आयोगाची (8th Central Pay Commission) प्रक्रिया औपचारिकरीत्या आणि वेगाने सुरू केली आहे. या प्रक्रियेचा एक महत्त्वाचा भाग म्हणून सरकारने www.8cpc.gov.in ही स्वतंत्र आणि अधिकृत वेबसाईट लाँच केली आहे. केवळ घोषणांवर विसंबून न राहता, आयोगाने आता थेट कर्मचाऱ्यांच्या कोर्टात चेंडू टोलावला असून, वेतन रचनेसंदर्भात खुद्द कर्मचाऱ्यांकडूनच हरकती आणि सूचना मागवण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.

या आयोगाचे कामकाज अधिक पारदर्शक आणि सर्वसमावेशक करण्यासाठी तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यात आला आहे. आयोगाने MyGov.in पोर्टलवर 18 प्रश्नांची एक सविस्तर प्रश्नावली दिली आहे. वेतन, पेन्शन, भत्ते आणि सरकारी वेतन प्रणालीचे स्वरूप कसे असावे, यावर आपले मत नोंदवण्याची संधी आता सर्वांना मिळणार आहे. केवळ केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनर्सच नव्हे, तर कर्मचारी संघटना, नियामक संस्था, विधी अधिकारी, संशोधक, शिक्षणतज्ज्ञ आणि अगदी सर्वसामान्य नागरिकही या प्रक्रियेत सहभागी होऊ शकतात.

हेही वाचा: Kolhapur Zilla Parishad Election 2026 : जिल्ह्यात स्थानिक पक्षांचं तगडं आव्हान, महायुतीतील अंतर्गत कलह ठरू शकेल का घातक?: तालुकानिहाय समीकरण बदलली

या प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी एक महत्त्वाची डेडलाईन लक्षात ठेवणे आवश्यक आहे. आठव्या वेतन आयोगाच्या अधिसूचनेनुसार, ही प्रश्नावली भरण्याची अंतिम तारीख 16 मार्च 2026 आहे. तसेच, आयोगाने हे स्पष्ट केले आहे की, आता जुन्या पद्धतीचे पत्रव्यवहार, ईमेल्स किंवा पीडीएफ स्वरूपातील सूचना स्वीकारल्या जाणार नाहीत. संपूर्ण प्रक्रिया डिजिटल आणि पारदर्शक ठेवण्याच्या उद्देशाने सर्व सूचना केवळ 'MyGov' पोर्टलद्वारेच स्वीकारल्या जातील. आयोगाची स्थापना जानेवारी 2025 मध्ये झाली होती आणि आता दिल्लीतील कार्यालयातून आयोगाचे काम पूर्ण गतीने सुरू झाले आहे.

अनेकदा सरकारी कर्मचारी सेवेत असताना त्यांचे स्पष्ट मत मांडायला कचरतात किंवा दडपणात असतात. ही बाब लक्षात घेऊन आयोगाने एक अत्यंत महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. प्रश्नावली भरणाऱ्या कोणत्याही व्यक्तीची किंवा संस्थेची ओळख सार्वजनिकरित्या उघड केली जाणार नाही, असे आयोगाने स्पष्ट आश्वासन दिले आहे. उत्तरांचे विश्लेषण एकत्रितपणे केले जाईल आणि वैयक्तिक गोपनीयता पूर्णपणे जपली जाईल. त्यामुळे कर्मचाऱ्यांना आता कोणत्याही 'दबावाविना त्यांचे म्हणणे मांडता येणार आहे.

हा आयोग केवळ पगारवाढीपुरता मर्यादित नसून, तो देशाच्या अर्थव्यवस्थेवर दूरगामी परिणाम करणारा ठरणार आहे. विशेषतः 'फिटमेंट फॅक्टर' (Fitment Factor) कोणत्या तत्त्वावर निश्चित करावा, वरिष्ठ पदांचे वेतन आणि कामगिरीवर आधारित वेतनाची रचना (Performance based pay) कशी असावी, यासारख्या संवेदनशील आणि तांत्रिक मुद्द्यांवर आयोगाने मते मागवली आहेत. महागाई, वित्तीय तूट आणि विकास खर्च यांचा समतोल राखत, कर्मचाऱ्यांचे हित जपण्याचे मोठे आव्हान आयोगासमोर आहे. त्यामुळेच, कोट्यवधी कर्मचाऱ्यांचे भविष्य ठरवणाऱ्या या प्रक्रियेत आपला सहभाग नोंदवणे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.

हेही वाचा: Isha Mahashivratri 2026 : मध्यरात्रीच्या ध्यानापासून ते संगीत कार्यक्रमांपर्यंत; सद्गुरूंसोबत ईशा महाशिवरात्री २०२६ मध्ये तुम्ही काय अनुभवू शकता, जाणून घ्या


सम्बन्धित सामग्री