नवी मुंबई : राज्यभरात थरावर थर लावत दहीहंडीचा सण उत्साहात साजरा करण्यात आला. पण एकीकडे थराचा खेळ झाला पण गोविंदाचा हाकनाक बळी गेला आहे. नवी मुंबईमध्ये थरावरून कोसळल्यामुळे एका 34 वर्षीय गोविंदाचा मृत्यू झाला आहे. मुंबई आणि नवी मुंबईमध्ये दिवसभरात 2 गोविंदाचा मृत्यू झाला आहे.
नवी मुंबईतील ऐरोली येथे आयोजित दहीहंडी उत्सवात मानवी थर रचताना तोल जाऊन पडल्याने घणसोलीतील एका 34 वर्षीय गोविंदाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ऐरोली येथील साईनाथ वाडी येथे आयोजित दहीहंडीत थर लावताना ही दुर्दैवी घटना घडली आहे. मृत गोविंदाचे नाव स्वप्निल असून मानवी मनोऱ्याचे थर रचत असताना अचानक संतुलन बिघडले आणि थर कोसळल्याने ही दुर्दैवी घटना घडली. आयोजकांनी गोविंदाला तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेमुळे नवी मुंबईत शोककळा पसरली असून रबाळे पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.
दुसरीकडे मालाडच्या मालवणी परिसरात स्थानिक मुले आपापल्या पद्धतीने दहीहंडी साजरी करत असताना हंडी बांधलेला खांब कोसळून सात वर्षीय रुद्र कदम याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यातच त्याचा मृत्यू झाला. शनिवारी मालाड पश्चिम येथील मालवणी परिसरातील मार्वे रोडवरील चिकुवाडी येथील एकता वेल्फेअर सोसायटीत चिमुकल्यांनीही दरवर्षीप्रमाणे दहीकाला उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर मुलांनी हंडी फोडण्यासाठी दोर एका झाडाला आणि इमारतीच्या तळमजल्यावरील खांबाला बांधला होता. हंडी फोडण्याचा प्रयत्न सुरू असतानाच हा खांब कोसळून रुद्रच्या डोक्याला मार लागला. रुद्रला तातडीने उपचारासाठी मालवणी जनरल रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. दहीहंडीच्या जल्लोषात घडलेल्या या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
दहीहंडीदरम्यान 168 गोविंदा जखमी
मुंबई दहीकाला उत्सवात मानवी मनोरे रचताना झालेल्या दुर्घटनांमध्ये शनिवारी रात्रीपर्यंत मुंबईतील विविध सरकारी आणि महापालिका रुग्णालयांत 168 गोविंदा जखमी झाल्याची नोंद झाली आहे. त्यापैकी 29 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, 81 जणांवर उपचार सुरू आहेत. उपचारानंतर 58 गोविंदांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. रात्री 9 वाजेपर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, सेंट्रल रिजनमधील रुग्णालयांत 106, ईस्टर्न सबर्ब्समधील रुग्णालयांत 29, तर वेस्टर्न सबर्ब्समधील रुग्णालयांत 33 जखमी गोविंदांची नोंद झाली.
केईएम रुग्णालयात सर्वाधिक 33 जखमी दाखल झाले. त्यापैकी सहा जण रुग्णालयात दाखल असून 12 जणांवर उपचार सुरू आहेत, तर 15 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. राजावाडी रुग्णालयात 20, नायरमध्ये 17, पोतदारमध्ये 16, हिंदुजा येथे 14, बीडीबीए रुग्णालयात 13, तर सायन रुग्णालयात आठ जखमी गोविंदांची नोंद झाली. राजावाडी येथे सहा जण दाखल असून पाच जणांवर उपचार सुरू आहेत. नायरमध्ये चार जण दाखल असून 13 जणांवर उपचार सुरू आहेत. सायनमध्ये चार जण दाखल आहेत. हिंदुजा येथे दोन, तर बीडीबीए रुग्णालयात दोन गोविंदांना दाखल करण्यात आले आहे. दरवर्षी दहीहंडीच्या उत्साहात मानवी मनोरे रचताना गोविंदांना दुखापत होते. यंदाही थरांचा थरार कायम असताना जखमींची संख्या वाढली आहे.