Air India Flight Emergency Landing : दिल्लीहून मुंबईच्या दिशेने झेपावलेल्या एअर इंडियाच्या विमानाला सोमवारी सकाळी एका मोठ्या संकटाचा सामना करावा लागला. उड्डाण केल्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच विमानाचे एक इंजिन हवेतच बंद पडल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते, मात्र वैमानिकाच्या प्रसंगावधामुळे मोठी दुर्घटना टळली.
उड्डाणानंतर काही वेळातच तांत्रिक बिघाड
सोमवारी सकाळी 6:10 वाजता दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून (IGI) मुंबईसाठी एअर इंडियाच्या AI 887 या विमानाने टेक-ऑफ केले होते. मात्र, आकाशात झेपावल्यानंतर काही वेळातच या बोईंग विमानातील एका इंजिनमध्ये गंभीर तांत्रिक बिघाड झाला आणि ते अचानक बंद पडले. ही बाब लक्षात येताच वैमानिकाने त्वरित नियंत्रण कक्षाशी संपर्क साधला आणि विमान पुन्हा दिल्लीकडे वळवण्याचा निर्णय घेतला. सुरक्षिततेच्या सर्व नियमांचे (SOP) पालन करत सकाळी 6:52 वाजता विमानाचे दिल्ली विमानतळावर सुरक्षित आपत्कालीन लँडिंग करण्यात आले.
प्रवासी आणि कर्मचारी सुखरूप
या अनपेक्षित घटनेमुळे विमानातील प्रवाशांचा जीव टांगणीला लागला होता, परंतु सुदैवाने सर्व प्रवासी आणि चालक दलाचे सदस्य पूर्णपणे सुरक्षित आहेत. विमान जमिनीवर उतरल्यानंतर तातडीने सर्व प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. एअर इंडियाच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रवाशांची सुरक्षा हीच कंपनीची सर्वोच्च प्राथमिकता आहे. विमानाचे लँडिंग झाल्यानंतर तांत्रिक पथकाने इंजिनच्या तपासणीचे काम हाती घेतले असून बिघाडाचे नेमके कारण शोधले जात आहे.
AI887 from Delhi to Mumbai on 22 December, after take-off, returned to Delhi due to a technical issue, as per standard operating procedure. The aircraft landed safely at Delhi, and the passengers and crew disembarked: Air India Spokesperson — ANI (@ANI) December 22, 2025
पर्यायी विमानाची व्यवस्था
विमान पुन्हा दिल्लीत उतरवावे लागल्याने प्रवाशांचा प्रवास खोळंबला होता. या गैरसोयीबद्दल एअर इंडियाने खेद व्यक्त केला असून, प्रवाशांना त्यांच्या नियोजित स्थळी म्हणजे मुंबईला पोहोचवण्यासाठी तातडीने दुसऱ्या पर्यायी विमानाची व्यवस्था करण्यात आली. विमानतळावर प्रवाशांच्या खाण्यापिण्याची आणि विश्रांतीची देखील काळजी घेण्यात आली. अचानक उद्भवलेल्या या परिस्थितीमुळे विमानाचे वेळापत्रक काही काळ विस्कळीत झाले होते, मात्र तातडीच्या उपाययोजनांमुळे प्रवाशांना दिलासा मिळाला.