Anjali Damania Post After Ajit Pawar Funeral : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावर आज, 29 जानेवारी 2026 रोजी बारामतीमधील विद्याप्रतिष्ठानच्या प्रांगणात अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांनी त्यांना अखेरची श्रद्धांजली वाहिली. सकाळी 11:00 वाजता त्यांच्या पुत्रांनी, पार्थ आणि जय पवार यांनी मुखाग्नी दिला. 'अजित पवार अमर रहे'च्या घोषणांनी बारामतीचा आसमंत दुमदुमून गेला होता. यावेळी अजित पवार यांना निरोप देण्यासाठी लाखोंचा जनसमुदाय उपस्थित होता.
अंजली दमानियांचा 'तो' वैचारिक लढा
अजित पवार हयात असताना त्यांच्या धोरणांविरोधात आणि विशेषतः सिंचन घोटाळ्यासारख्या प्रकरणांमध्ये अंजली दमानिया यांनी प्रदीर्घ संघर्ष केला होता. त्यांनी अनेकदा पवार कुटुंबाच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. मात्र, आजच्या या दुर्दैवी प्रसंगी दमानिया यांनी आपले वैयक्तिक आणि वैचारिक मतभेद बाजूला ठेवले. त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत म्हटले की, "अजित पवार यांच्याविरुद्ध मी माझ्या आयुष्याचा मोठा काळ संघर्ष केला. तो वैचारिक आणि तत्त्वांचा लढा होता. पण आज त्यांच्या निधनाने तो संघर्ष संपला आहे."
हेही वाचा - Ajit Pawar Death: 'महाराष्ट्राचा आधार हरपला...'; अजितदादांच्या निधनाने कलाविश्व हळहळले, संकर्षण कऱ्हाडे आणि वंदना गुप्तेंनी शेअर केल्या आठवणी
मृत्यूसमोर सर्व वाद थांबतात
अंजली दमानिया यांनी आपल्या पोस्टमध्ये मृत्यूच्या अटळ सत्यावर भाष्य केले. त्या म्हणाल्या, "मतभेद कितीही तीव्र असले, तरी मृत्यूसमोर सर्व वाद थांबतात. आज हा क्षण लोकशाही, मूल्ये आणि संघर्षाचा विचार करण्याचा आहे." ज्या नेत्याविरोधात त्या आयुष्यभर लढल्या, त्याच नेत्याच्या आकस्मिक जाण्याने त्या देखील सुन्न झाल्या आहेत. "ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो," असे म्हणत त्यांनी आपल्या संघर्षाला पूर्णविराम दिला. राजकीय विरोध असला तरी मानवी संवेदनांना दिलेले हे प्राधान्य सर्वांचे लक्ष वेधून घेणारे ठरले.
कसा घडला दुर्दैवी अपघात?
बुधवारी, 28 जानेवारी 2026 रोजी सकाळी 8:40 वाजता अजित पवार यांचे विमान बारामती विमानतळावर लँडिंग करताना कोसळले. खराब हवामानामुळे धावपट्टीचा अंदाज न आल्याने वैमानिकाचा प्रयत्न अयशस्वी ठरला आणि विमान शेतात कोसळून मोठा स्फोट झाला. या भीषण अपघातात अजित पवारांसह त्यांचे सुरक्षा रक्षक विदीप जाधव, वैमानिक कॅप्टन सुमीत कपूर, शांभवी पाठक आणि फ्लाईट अटेंडंट पिंकी माळी अशा एकूण 6 जणांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने महाराष्ट्राच्या राजकारणातील एका मोठ्या पर्वाचा करुण अंत झाला.
हेही वाचा - '...गेल्या जवळपास 35 ते 40 वर्षांपासून', जयंत पाटील यांची अजित पवारांच्या अचानक निधनावर भावुक पोस्ट; म्हणाले, 'सर्वात वाईट..'