Sunday, November 16, 2025 11:51:53 PM

मंगल कार्यांना होणार सुरुवात! जाणून घेऊ कधी आहे तुळशी विवाह, प्रबोधिनी एकादशी, त्रिपुरारी पौर्णिमा आणि त्यांचे महत्त्व

कार्तिक महिन्यात प्रबोधिनी एकादशी, तुळशी विवाह, कार्तिक पौर्णिमा यांसारखे महत्त्वाचे सण साजरे केले जातात. यातील प्रबोधिनी एकादशीने शुभ कार्यांना पुन्हा सुरुवात होते.

मंगल कार्यांना होणार सुरुवात जाणून घेऊ कधी आहे तुळशी विवाह प्रबोधिनी एकादशी त्रिपुरारी पौर्णिमा आणि त्यांचे महत्त्व

Auspicious Kartik Month : धार्मिकदृष्ट्या कार्तिक महिना अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या महिन्यात प्रबोधिनी एकादशी, तुळशी विवाह, कार्तिक पौर्णिमा यांसारखे महत्त्वाचे सण साजरे केले जातात. यातील प्रबोधिनी एकादशीने शुभ कार्यांना पुन्हा सुरुवात होते. या एकादशीला भगवान विष्णू चार महिन्यांच्या योगनिद्रेतून जागे होतात. याच महिन्यात होणाऱ्या कार्तिक पौर्णिमेला (Kartik Purnima) दान-पुण्याचे विशेष महत्त्व असते. या महिन्यात प्रबोधिनी एकादशी, तुळशी विवाह तिथी आणि कार्तिक पौर्णिमा म्हणजेच, त्रिपुरारी पौर्णिमा कधी आहे आणि त्यांचे महत्त्व काय आहे, जाणून घेऊ.

प्रबोधिनी एकादशीची तिथी आणि महत्त्व
एकादशी तिथींमध्ये प्रबोधिनी एकादशीला विशेष महत्त्व आहे, यालाच 'हरिप्रबोधिनी एकादशी' असेही म्हणतात. कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला ही तिथी येते. धार्मिक मान्यतेनुसार, या दिवशी भगवान विष्णू त्यांच्या चार महिन्यांच्या निद्रेतून जागे होतात. यामुळे पृथ्वीवर लग्न, गृहप्रवेश, मुंडन यांसारख्या सर्व मांगलिक (शुभ) कार्यक्रमांना पुन्हा एकदा सुरुवात होते.
तिथी: यावर्षी प्रबोधिनी एकादशी 2 नोव्हेंबर, रविवारी साजरी केली जाईल.
वेळ: एकादशी तिथी 1 नोव्हेंबर, शनिवारी सकाळी 9 वाजून 11 मिनिटांनी सुरू होईल आणि 2 नोव्हेंबर, रविवारी सकाळी 7 वाजून 31 मिनिटांपर्यंत राहील.

तुळशी विवाह तिथी, विधी आणि महत्व
प्रबोधिनी एकादशीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच द्वादशी तिथीला तुळशी विवाह साजरा केला जातो. हिंदू धर्मातील हा एक अत्यंत महत्त्वाचा सण आहे. या दिवशी तुळशीचे लग्न भगवान विष्णूंच्या शालिग्राम रूपाशी लावले जाते. तुळशीच्या विवाहानंतर विवाहमुहुर्त आणि इतर शुभकार्यांचे मुहुर्त सुरू होतात.
तिथी: यंदा तुळशी विवाह 2 नोव्हेंबर, रविवारी साजरा केला जाईल.
वेळ: द्वादशी तिथी 2 नोव्हेंबर रविवारी सकाळी 7 वाजून 31 मिनिटांनी सुरू होऊन 3 नोव्हेंबर सोमवारी सकाळी 5 वाजून 07 मिनिटांपर्यंत राहील.
विधी: या विवाहासाठी तुळशीच्या रोपाला नवरीसारखे सजवले जाते आणि तिला साजशृंगार वाहिली जाते. हवन, भजन आणि विधीवत पूजा करून हा विवाह सोहळा पार पाडला जातो.
महत्त्व: तुळशी विवाह केल्याने वैवाहिक जीवनात प्रेम वाढते आणि कुंडलीतील विवाह संबंधित दोष दूर होतात, अशी धार्मिक मान्यता आहे.

हेही वाचा - Tulsi Vivah 2025 : तुळशी विवाहाच्या दिवशी शुक्र ग्रहाचे गोचर; 'या' राशींवर बरसणार माता लक्ष्मीची विशेष कृपा

कार्तिक पौर्णिमा तिथी आणि महत्त्व
कार्तिक पौर्णिमा ही हिंदू धर्मातील एक अत्यंत पवित्र आणि पुण्यदायी तिथी मानली जाते. याच दिवसाला 'देवदिवाळी' म्हणूनही ओळखले जाते, कारण याच दिवशी भगवान शिवाने त्रिपुरासुर राक्षसाचा वध केला होता.
तिथी: कार्तिक पौर्णिमा 5 नोव्हेंबर, बुधवारी साजरी केली जाईल.
वेळ: पौर्णिमा तिथी 4 नोव्हेंबर, मंगळवारी रात्री 10 वाजून 36 मिनिटांनी सुरू होऊन 5 नोव्हेंबर, बुधवारी संध्याकाळी 6 वाजून 48 मिनिटांपर्यंत राहील.
महत्त्व: या दिवशी गंगा, यमुना आणि इतर पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे आणि दीपदान करणे खूप महत्त्वाचे आहे. कार्तिक पौर्णिमेला केलेले पुण्य कधीही नष्ट होत नाही आणि यामुळे पितरांना तृप्ती मिळते, असे मानले जाते.

हेही वाचा - Tulsi Upaay: संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावल्याने हे 5 फायदे मिळतील

(Disclaimer : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. जय महाराष्ट्र त्याची हमी देत नाही.)


सम्बन्धित सामग्री