Ayodhya Ram Mandir Flag Hoisting: अयोध्या नगरीत आजचा दिवस अत्यंत ऐतिहासिक ठरणार आहे. रामलल्लाच्या मंदिराच्या शिखरावर प्रथमच अधिकृत रामध्वज फडकणार असून, हा सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते दुपारी 12 वाजता पार पडणार आहे. मंदिराच्या उद्घाटनानंतर प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या या ध्वजारोहण सोहळ्याबाबत देशभरातील भाविकांमध्ये प्रचंड उत्सुकता पाहायला मिळते. सकाळपासून अयोध्येत भाविकांची मोठी गर्दी जमा झाली असून, ‘जय श्रीराम’च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमला आहे.
ध्वजाची विशेष रचना: अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर
राम मंदिरासाठी तयार करण्यात आलेला ध्वज अत्यंत खास आहे. हवामानातील कोणत्याही बदलाचा परिणाम याच्यावर होऊ नये यासाठी या ध्वजाचे विणकाम ‘पॅराशूट फॅब्रिक’पासून केले गेले आहे. संरक्षण दलात वापरल्या जाणाऱ्या या कापडाची टिकाऊपणा व हलकं वजन ही प्रमुख वैशिष्ट्यं आहेत.
या ध्वजाची लांबी 22 फूट आणि रुंदी 11 फूट आहे, तर वजन सुमारे 11 किलो आहे. मंदिराच्या 161 फूट उंच शिखरावर बसवलेल्या 44 फूट उंचीच्या ध्वजदंडावर हा ध्वज फडकवला जाणार असून, एकूण उंची 205 फूट इतकी आहे. ध्वज 360 अंशात फिरू शकावा यासाठी विशेष यंत्रणा बसवण्यात आली आहे.
ध्वजावरील पवित्र चिन्हे
रामध्वजावर अनेक धार्मिक आणि सांस्कृतिक चिन्हे अंकित केली गेली आहेत. सूर्यवंशाचं प्रतीक असलेला प्रभामंडित सूर्य, समन्वयाचं प्रतीक ‘ॐ’ आणि कांचन वृक्षाचं प्राचीन चिन्ह या ध्वजावर दिसणार आहे. भगवा रंग शौर्य, त्याग आणि धर्माचं प्रतिक म्हणून या ध्वजाला विशेष आध्यात्मिक महत्त्व प्राप्त होतं.
अयोध्येत भाविकांची मोठी गर्दी
दुपारी होणाऱ्या ध्वजारोहण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर अयोध्येत भाविकांची प्रचंड गर्दी उसळली आहे. देशभरातून हजारो भक्त आज सकाळपासून दर्शनासाठी पोहोचले असून, शहरातील सर्व प्रमुख मार्गांवर वाहतूक नियंत्रित करण्यात आली आहे. परदेशातूनही अनेक भक्त सहभागी होण्यासाठी आले आहेत.
कडक सुरक्षा व्यवस्था
पंतप्रधानांच्या भेटीमुळे अयोध्येत बहुस्तरीय सुरक्षा तैनात आहे. ध्वजारोहण सोहळा निर्विघ्नपणे पार पडावा यासाठी सैन्य आणि विशेष सुरक्षा दलांनी गेल्या काही दिवसांपासून सराव केल्याची माहिती आहे. आज दुपारी पंतप्रधान मोदी मंदिराच्या शिखरावर ध्वज फडकवताना सैन्याचे जवान त्यांना सहाय्य करतील.
मंदिराच्या वास्तुकलेला नवं वैभव
नागरा शैलीत बांधलेले राम मंदिर, त्याभोवतीचा 800 मीटरचा पार्कोटा आणि शिल्पकलेने सजलेले दगडी खांब यामुळे मंदिराचा परिसर अधिकच भव्य दिसतो. आजचा ध्वजारोहण सोहळा मंदिराच्या आध्यात्मिक आणि सांस्कृतिक तेजात भर घालणार आहे.
आजचा दिवस ऐतिहासिक ठरणार यात शंका नाही. दुपारी 12 वाजता होणाऱ्या सोहळ्यानंतर राम मंदिराच्या शिखरावर भगवा रामध्वज फडकताना पाहण्यासाठी लाखो भाविक उत्सुक आहेत