मुंबई : लोकल प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. मध्य रेल्वेच्या कसारा मार्गावर पुन्हा एकदा तांत्रिक बिघाडामुळे प्रवाशांना मोठ्या त्रासाला समोरं जावं लागत आहे. खर्डी आणि उंबरमाळी या स्थानकादरम्यान 12880 भुवनेश्वर एक्सप्रेसचं इंजिन अचानक फेल झालं. त्यामुळे या मार्गावरील रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आणि कसाऱ्याकडे जाणारी लोकल ही खर्डी या स्थानकावर रद्द करण्यात आली आहे.
कसारा, इगतपुरी, नाशिककडे जाणाऱ्या प्रवाशांचे हाल
रात्रीच्या वेळी अचानक लोकल रद्द झाल्यामुळे खर्डी स्थानकातच प्रवाशांची मोठी गर्दी झाली. कसारा, इगतपुरी तसेच नाशिकच्या दिशेने जात असलेल्या असंख्य प्रवाशांना पुढील गाडीती प्रतीक्षा करत तब्बल दीड तास स्थानकातच थांबावं लागलं. त्यातच काही वेळ स्थानक परिसरात अंधारही असल्याने प्रवाशांच्या अडचणीत आणखी भर पडली.
लोकल सेवा रद्द केल्यानंतर प्रवाशांसाठी पर्यायी वाहतुकीची कोणतीही ठोस व्यवस्था करण्यात आली नसल्याचा ही आरोप प्रवाशांकडून करण्यात आला आहे. त्यामुळे अनेक प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त केली आहे. रात्री उशिराची वेळ असल्याने अनेक महिला आणि ज्येष्ठ नागरिक, लहान मुलांसह प्रवास करत असलेल्या प्रवाशांनाही याचा मोठा त्रास सहन करावा लागला आहे.
खरं तर टिटवाळा ते कसारा या रेल्वे मार्गावर तांत्रिक बिघाडाच्या वारंवाक घटना घडत असल्याने प्रवाशांकडून कायमस्वरुपी उपाययोजन करण्याची मागणी होत आहे. फक्त बिघाड झाल्यानंतर तात्पुरत्या उपाययोजन करण्याऐवजी रेल्वे प्रशासाने या मार्गावरील असलेल्या सर्व तांत्रिक समस्या शोधून यावर कायमसाठी तोडगा काढावा, अशी मागणी प्रवाशांनी केलेली आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.