आज सर्वत्र बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीचे बिगुल वाजत आहे. आज सकाळपासून एनडीएची आघाडी घेत विजयाकडे वाटचाल करत असल्याच पाहायला मिळत आहे. सुरुवातीपासूनच बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीत प्रचंड चुरस पाहायला मिळत आहे. सध्याच्या कलांवरून असे स्पष्ट दिसून येत आहे की एनडीए 243 पैकी 192 जागांवर आघाडीवर आहे, तर महाआघाडी 46 जागांपर्यंत मर्यादित असून महाआघाडी मोठ्या अंतराने मागे आहे. तर दुसरीकडे मागील निवडणुकीत फक्त 1 जागा जिंकलेल्या लोक जनशक्ति पार्टीने यंदा अविश्वसनीय पुनरागमन करत एनडीएकडून मिळालेल्या 29 पैकी 22 जागांवर आघाडी घेतली आहे. सध्या, या प्रचंड विजयाचे सहा मुख्य स्तंभ आहेत. ते कोणते जाणून घ्या...
1. या संपूर्ण निवडणूक निकालात सर्वाधिक चर्चेत असलेले नाव म्हणजे चिराग पासवान. चिराग पासवान यांचा स्ट्राइक रेट दणदणीत ठरलेला आहे. प्रचार मोहिमेदरम्यान त्यांनी वारंवार 100% स्ट्राइक रेट साध्य करण्याचा दावा केला होता, आणि सध्या पाहायला मिळत असलेल्या निकालातून त्यांचे म्हणणे मोठ्या प्रमाणात खरे ठरताना दिसते. रामविलास पासवान यांचे पुत्र चिराग पासवान यांनी त्यांची तरुणाईची ऊर्जा आणि पासवान व्होट बँक (5-6%) एकत्रित करून युती मजबूत केली. त्यांच्या 100 हून अधिक रॅली आणि सोशल मीडियावरील मजबूत उपस्थितीमुळे चिराग पासवान यांना पडणारे मत अधिक बळकट झाले. त्यामुळे हे स्पष्ट दिसून येते की, बिहारमध्ये जनता दल युनायटेड आणि भाजप दोन्ही पक्ष इतके चांगले प्रदर्शन करत आहेत याचे कारण एनडीएला चिराग पासवान यांचा पाठिंबा आहे.
2. त्याचसोबत एनडीएच्या प्रचंड मतांच्या आघाडीवर असण्यात मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे देखील योगदान आहे. आरक्षण आणि कल्याणकारी योजनांद्वारे नितीश यांनी एकत्र केलेले ईबीसी (अत्यंत मागासवर्गीय, 36%) असोत किंवा उच्च जाती असोत, सर्व वर्ग त्यांचा आदर करतात. तसेच अनेक मुस्लिमांनीही त्यांना मतदान केले. बिहारचे सर्वात जास्त काळ मुख्यमंत्री राहिलेले 74 वर्षीय नितीश कुमार यांनी त्यांच्या राजकीय कौशल्याद्वारे युतीला एक मजबूत पाया मिळाला.
3. बिहार निवडणुकीत एनडीएने उल्लेखनीय समन्वय दाखवला असून भाजप आणि जेडीयू दोन्ही पक्षांना प्रत्येकी 101 जागा मिळवण्यात यश आल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र भाजप आणि जेडीयूमध्ये तीव्र स्पर्धा असल्याचं पाहायला मिळत आहे.
4. नितीश कुमार हे बिहारमध्ये निर्विवाद प्रतिमा असलेले नेते आहेत. सर्व वर्ग आणि समुदायांमध्ये त्यांचा समान आदर केला जातो. भाजप त्यांना नाकारू शकत नव्हते. म्हणूनच, भाजपने त्यांच्या नावाभोवती धोरणात्मक गोंधळ कायम ठेवला. नितीश कुमार समर्थक आणि त्यांचे विरोधक दोघांनाही खुश करण्यासाठी ही रणनीती अवलंबली आणि ती यशस्वी होताना दिसते.
5. एनडीएच्या विजयाचे सुशासन आणि विकास हे देखील स्तंभ होते, जे नितीश कुमार यांच्या 20 वर्षांच्या राजवटीचे प्रतीक आहे. नितीश कुमार यांच्या सुशासनामुळे - कायदा आणि सुव्यवस्था सुधारली आणि गुन्हेगारीत 50% घट झाली. त्याचसोबत स्मार्ट सिटीज आणि एक्सप्रेसवे सारख्या विकास प्रकल्पांनी ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना दिली.
6. नितीश कुमार यांच्या "सात निश्चय" आणि भाजपच्या केंद्रीय योजनांनी 5 कोटी लाभार्थ्यांना फायदा मिळवून दिला आहे. पंतप्रधान आवास योजना, उज्ज्वला योजना आणि आयुष्मान योजनेने ग्रामीण मतदारांना आकर्षित केले आहे. सरकारी नोकऱ्यांमध्ये महिलांना आरक्षण दिल्याने एनडीएला एक मजबूत पाया मिळाला असून नितीश कुमार यांची रणनीती महिला कल्याणावर केंद्रित होती.