Mathura Boat Accident Video: आनंदात सुरू असलेल्या धार्मिक सहलीचे रूपांतर काही क्षणांतच भीषण दुर्घटनेत झाले. वृंदावन येथील यमुना नदीत पर्यटकांची बोट उलटून झालेल्या भीषण अपघातात पंजाबमधील 10 भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृत्यूच्या काही सेकंद आधीपर्यंत हे भाविक बोटीत आनंदाने भजन गात होते, ज्याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला असून तो पाहून अंगावर काटा येत आहे.
भजनाचा सूर किंकाळ्यांत बदलला
मिळालेल्या माहितीनुसार, पंजाबच्या लुधियाना आणि जग्राँ भागातील 30 हून अधिक भाविकांचा गट वृंदावन दर्शनासाठी आला होता. शुक्रवारी दुपारी ‘केशी घाटा’कडे जात असताना भाविक बोटीत भजन गाण्यात दंग होते. मात्र, अचानक बोट नदीतील एका तरंगत्या फलाटाला (फ्लोटिंग प्लॅटफॉर्म) धडकली आणि क्षणात उलटली. भजनाचे सूर उमटत असतानाच अचानक किंकाळ्या आणि वाचवण्यासाठी सुरू झालेली धडपड, असा काळजाचा ठोका चुकवणारा प्रसंग तिथे घडला.
बचावकार्य आणि प्रशासकीय माहिती
जिल्हाधिकारी चंद्रप्रकाश सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत 16 ते 17 जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. स्थानिक पाणबुड्यांनी तातडीने नदीत उड्या घेतल्यामुळे अनेकांचे प्राण वाचले. मात्र, 5 भाविक अद्यापही बेपत्ता असून त्यांचा शोध घेण्यासाठी युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे.
मृतांमध्ये सहल आयोजकांचाही समावेश
ही सहल ‘बांके बिहारी क्लब’तर्फे आयोजित करण्यात आली होती. धक्कादायक म्हणजे, दरवर्षी ही सहल नेणाऱ्या जग्राँ येथील ज्या माय-लेकांनी या ट्रिपचे आयोजन केले होते, त्यांचाही या दुर्घटनेत बुडून मृत्यू झाल्याचे समजते. या अपघातातून बचावलेला चेतन याने सांगितले की, “आम्ही भजनात दंग होतो, अचानक बोट कशालातरी धडकली आणि आम्ही पाण्यात फेकले गेलो. डोळ्यांदेखत माणसं वाहून जाताना पाहणे अत्यंत भयानक होते.”
Live video of the boat accident in Mathura that claimed 10 lives. Steamer packed beyond capacity in UttarPradesh's Mathura. Devotees from Punjab chanting "Radhe Radhe". None of them wearing life jacket. The boat capsized, 10 people died. https://t.co/VYE0gwLAit pic.twitter.com/Vdpd9Mo6Jj — Hate Detector ? (@HateDetectors) April 10, 2026
दुर्घटनेचे नेमके कारण
प्राथमिक अंदाजानुसार, यमुनेच्या पात्रात असलेल्या एका लोखंडी किंवा लाकडी तरंगत्या संरचनेला बोटीचा धक्का लागला आणि संतुलन बिघडल्याने बोट उलटली. मृतांमधील बहुतांश नागरिक लुधियाना परिसरातील आहेत. या घटनेमुळे वृंदावन परिसरात आणि पंजाबमध्ये शोककळा पसरली आहे.