Constitution Day India 2025: पंतप्रधान मोदींची संविधान सदनातील मुख्य कार्यक्रमाला उपस्थिती; जाणून घ्या संविधान दिनाचे महत्त्व आणि इतिहास

भारताचा संविधान दिवस हा लोकशाहीच्या पायाभरणीचा ऐतिहासिक क्षण आहे. 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान स्वीकारले गेले. या दिवशी संविधानाच्या मूल्यांची आणि नागरिकांच्या कर्तव्यांची आठवण करून दिली जाते.

Constitution Day India 2025: पंतप्रधान मोदींची संविधान सदनातील मुख्य कार्यक्रमाला उपस्थिती;  जाणून घ्या संविधान दिनाचे  महत्त्व आणि इतिहास

Constitution Day India 2025: 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिनानिमित्त संसद भवनातील संविधान सदनाच्या सेंट्रल हॉलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या मुख्य कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. सकाळी सुमारे 11 वाजता सुरू होणाऱ्या या सोहळ्यात भारताच्या संविधान स्वीकारण्याच्या 76 व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून विविध महत्त्वपूर्ण उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमात राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, लोकसभा अध्यक्ष आणि दोन्ही सभागृहातील खासदार उपस्थित राहणार आहेत. संविधान दिन हा देशाच्या लोकशाही परंपरांचा आणि संवैधानिक मूल्यांचा गौरव करणारा दिवस असल्याने या सोहळ्याला विशेष महत्त्व आहे.

कार्यक्रमादरम्यान राष्ट्रपती भारताच्या संविधानातील प्रस्तावना वाचनाचे नेतृत्व करतील. याशिवाय संविधानाचे अनुवादित स्वरूप असलेले आवृत्ती-पुस्तक नऊ भाषांमध्ये  मल्याळम, मराठी, नेपाळी, पंजाबी, बोदो, काश्मिरी, तेलुगू, ओडिया आणि आसामी अधिकृतपणे प्रकाशित केले जाणार आहे.

तसेच ‘भारत के संविधान में कला और कैलीग्राफी’ या शीर्षकाचा स्मरणिकापुस्तकाचा प्रकाशन सोहळाही यावेळी होणार आहे. भारतीय संविधानातील कलात्मक मांडणी आणि सुलेखन परंपरेचे दर्शन घडवणारी ही स्मरणिका संविधानाच्या ऐतिहासिकतेला आणि सौंदर्याला नव्याने उजाळा देणारी ठरणार आहे.

संविधान दिन का साजरा केला जातो?

26 नोव्हेंबर 1949 रोजी भारताच्या संविधान सभेने दीर्घ चर्चेनंतर संविधान स्वीकारले. जवळपास तीन वर्षांहून अधिक काळ सुरू असलेल्या मेहनतीच्या प्रक्रियेला अखेर या दिवशी शिक्कामोर्तब झाले आणि देशाने एका भक्कम कायदेशीर चौकटीकडे वाटचाल सुरू केली. नंतर 1950 रोजी 26 जानेवारीला संविधान प्रत्यक्षात लागू झाले आणि भारत अधिकृतपणे प्रजासत्ताक बनला.

2015 साली भारत सरकारने 26 नोव्हेंबरला ‘संविधान दिन’ म्हणून औपचारिक मान्यता दिली. हा निर्णय डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125व्या जयंती वर्षानिमित्त घेण्यात आला, कारण संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी निभावलेली भूमिका अमूल्य आहे.

संविधान निर्माणाचा प्रवास

1946 मध्ये स्थापन झालेल्या संविधान सभेत देशभरातील विविध भागांतून निवडून आलेले सदस्य सहभागी झाले. डॉ. राजेंद्र प्रसाद हे सभेचे अध्यक्ष होते, तर संविधानाचा मसुदा तयार करण्याची सर्वात मोठी जबाबदारी डॉ. बी.आर. आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील मसुदा समितीवर होती. अनेक सुधारणांनंतर, चर्चेनंतर आणि मंथनानंतर तयार झालेले भारतीय संविधान आज जगातील सर्वात मोठे लिखित संविधान मानले जाते. नियम, हक्क, कर्तव्ये, न्यायव्यवस्था, केंद्र-राज्य संबंध अशा विविध घटकांचे तपशीलवार वर्णन त्यात समाविष्ट आहे.

संविधानाची मूलभूत तत्त्वे

भारतीय संविधानाची प्रस्तावना देशाला “संपूर्ण प्रभुत्वसंपन्न, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य” असे घोषित करते. न्याय, स्वातंत्र्य, समानता आणि बंधुता ही मूल्ये प्रत्येक नागरिकाला देण्याचा त्यात स्पष्ट उल्लेख आहे. ही मूल्ये केवळ शब्द नाहीत, तर देशाच्या एकात्मतेसाठी आवश्यक असलेली मजबूत पायाभरणी आहेत.

संविधान दिनाचे महत्त्व

आजचा दिवस म्हणजे त्या सर्व सदस्यांना स्मरण करण्याचा क्षण आहे, ज्यांनी भारताचे भविष्य घडवण्याची दूरदृष्टी दाखवली. संविधानाने देशाला कायदेशीर आधार तर दिलाच, पण सामाजिक न्यायही दिला. शोषण, भेदभाव आणि असमानतेविरुद्धचा संघर्ष याच दस्तावेजातून अधिक बळकट झाला.

संविधान दिन आपल्याला एका महत्वाच्या जबाबदारीची जाणीव करून देतो. अधिकारांसोबत कर्तव्यांचे पालनही तितकेच महत्त्वाचे आहे. लोकशाही तेव्हाच मजबूत होते, जेव्हा नागरिक स्वतःच्या भूमिका आणि जबाबदाऱ्या जाणून त्यानुसार वागतात.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number