CSK Ayush Mhatre Injury Update : चेन्नई सुपर किंग्सच्या (CSK) गोटातून एक अत्यंत चिंताजनक बातमी समोर आली आहे. संघाचा युवा सलामीवीर आयुष म्हात्रे हॅमस्ट्रिंगच्या (Hamstring) गंभीर दुखापतीमुळे आयपीएल 2026 मधून काही काळासाठी बाहेर पडला आहे. सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात 5 व्या षटकादरम्यान धाव घेताना म्हात्रेच्या पायाचे स्नायू ताणले गेले. वेदनेने विव्हळत असतानाही त्याने फलंदाजीचा प्रयत्न केला, परंतु हालचाल करणे कठीण झाल्याने तो लवकरच बाद झाला. महेंद्रसिंग धोनी आणि डेवाल्ड ब्रेविस आधीच फिटनेसच्या समस्यांशी झुंजत असताना, म्हात्रेची ही दुखापत ऋतुराज गायकवाडच्या संघासाठी डोकेदुखी ठरणार आहे.
चेन्नईच्या महत्त्वाच्या सामन्यांत खेळू शकणार नाही
वैद्यकीय अहवालानुसार, आयुष म्हात्रेला पूर्णपणे सावरण्यासाठी किमान 3 आठवड्यांचा कालावधी लागणार आहे. याचा अर्थ असा की, तो 10 मे पर्यंत कोणत्याही सामन्यात खेळू शकणार नाही. या कालावधीत चेन्नईचे 5 महत्त्वाचे सामने नियोजित असून, सध्याच्या नाजुक परिस्थितीत संघाला त्याच्या आक्रमक फलंदाजीची मोठी उणीव भासेल. प्रशिक्षक माईक हसी यांनीही म्हात्रेचे बाहेर पडणे हा संघासाठी मोठा सेटबॅक असल्याचे मान्य केले आहे. पहिल्या सामन्यात लवकर बाद झाल्यानंतर त्याने पंजाब विरुद्ध 73, दिल्ली विरुद्ध 50 आणि कोलकाता विरुद्ध 38 धावांची प्रभावी कामगिरी केली होती.
सलामीची जोडी पुन्हा एकदा बदलावी लागणार
गुणतालिकेचा विचार करता चेन्नई सुपर किंग्स सध्या सातव्या स्थानावर असून त्यांची कामगिरी निराशाजनक राहिली आहे. संघाने खेळलेल्या 6 सामन्यांपैकी केवळ 2 सामन्यांत विजय मिळवला असून 4 सामन्यांत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. सध्या चेन्नईच्या खात्यात 4 गुण असून त्यांचा नेट रनरेट -0.780 इतका खाली घसरला आहे. म्हात्रेच्या अनुपस्थितीत आता सलामीची जोडी पुन्हा एकदा बदलावी लागणार असून, यामुळे संघाचे संतुलन बिघडण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. बाद होण्यापूर्वी त्याने ज्या लयीत फलंदाजी केली होती, ती पाहता हा 'हुकूमी एक्का' गमावणे चेन्नईला महागात पडू शकते.
हेही वाचा – Match Fixing Case: क्रिकेटवर बिश्नोई गँगची दहशत; धमकीनंतर बदलला टी-20 वर्ल्डकपमधील 'या' संघाचा कर्णधार
म्हात्रेची उणीव भरून काढण्यासाठी कोणाला संधी?
हैदराबादविरुद्धच्या सामन्यात दुखापतग्रस्त झाल्यानंतर म्हात्रेला मैदानाबाहेर नेण्यासाठी फिजिओची मदत घ्यावी लागली होती. उभ्याउभ्या फटके मारण्याच्या नादात तो बाद झाला खरा, पण त्या एका झटक्याने चेन्नईच्या प्लेऑफच्या आशांना खिळ बसली आहे. आता उर्वरित सामन्यांमध्ये पुनरागमन करण्यासाठी चेन्नईला इतर भारतीय खेळाडूंवर अवलंबून राहावे लागेल. म्हात्रेची उणीव भरून काढण्यासाठी संघात कोणाला संधी मिळते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. सध्या तरी 10 मे पर्यंत म्हात्रेला विश्रांती देण्यात आली असून, तो थेट स्पर्धेच्या अखेरच्या टप्प्यातच मैदानात परतण्याची चिन्हे आहेत.
चेन्नई सुपर किंग्सचे आगामी सामने
23 एप्रिल – विरुद्ध मुंबई इंडियन्स
26 एप्रिल – विरुद्ध गुजरात टायटन्स
2 मे – विरुद्ध मुंबई इंडियन्स
5 मे – विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स
10 मे – विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स
15 मे – विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स
18 मे – विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद
21 मे – विरुद्ध गुजरात टायटन्स
हेही वाचा – IPL 2026 : KKR साठी 'करो या मरो' स्थिती! सलग 5 पराभवानंतर कोलकातावर टांगती तलवार