Bads of Bollywood vs Sameer Wankhede : नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB), मुंबईचे माजी झोनल डायरेक्टर आणि आयआरएस (IRS) अधिकारी समीर वानखेडे यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्यात दिल्ली उच्च न्यायालयाने बुधवारी (आज) महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. या प्रकरणात न्यायालयाने अभिनेता शाहरुख खानच्या 'रेड चिलीज एंटरटेनमेंट' (Red Chillies Entertainment) सह नेटफ्लिक्स (Netflix) आणि इतर कंपन्यांना समन्स (Summons) जारी केले आहे.
वानखेडे यांचा नेमका दावा काय?
समीर वानखेडे यांनी दाखल केलेली ही याचिका शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानने दिग्दर्शित केलेल्या 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड' (The Bads of Bollywood) या नेटफ्लिक्सच्या वेब सिरीजशी संबंधित आहे. या वेब सिरीजमध्ये आपली मानहानी (Defamation) करण्यात आली आहे, असा दावा समीर वानखेडे यांनी केला आहे.
नुकसानभरपाईची मागणी: वानखेडे यांनी या सिरीजविरोधात कायमस्वरूपी प्रदर्शित करण्यास मनाई आदेश आणि 2 कोटी रुपयांची नुकसानभरपाई मागितली आहे. विशेष म्हणजे, नुकसानभरपाईची ही रक्कम कर्करोगाच्या रुग्णांवर उपचारासाठी टाटा मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटलला दान करण्याची विनंतीही त्यांनी केली आहे.
संस्थेवर परिणाम: वानखेडे यांच्या याचिकेनुसार, "या वेब सिरीजमध्ये ड्रग्ज विरोधी अंमलबजावणी संस्थांचे दिशाभूल करणारे आणि नकारात्मक चित्रण केलेल आहे. शिवाय, हे सर्व जाणीवपूर्वक केलेले आहे, ज्यामुळे जनतेचा या संस्थांवरील विश्वास कमी होण्याची शक्यता आहे."
जाणूनबुजून नकारात्मक चित्रण आणि प्रदर्शन: आर्यन खान आणि समीर वानखेडे यांच्याशी संबंधित खटले मुंबई उच्च न्यायालय आणि एनडीपीएस विशेष न्यायालयात प्रलंबित असतानाही, ही सिरीज 'जाणूनबुजून' (Deliberately) प्रसिद्ध करण्यात आली आहे, असा युक्तिवादही त्यांनी केला आहे.
उच्च न्यायालयाचे निर्देश आणि पुढील सुनावणी
दिल्ली उच्च न्यायालयाने रेड चिलीज एंटरटेनमेंट आणि इतर प्रतिवादींना (Respondents) या याचिकेवर सात दिवसांच्या आत आपले लेखी उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता 30 ऑक्टोबर रोजी होणार आहे.
वानखेडे यांनी 'बॅड्स ऑफ बॉलीवूड'चे स्ट्रीमिंग आणि वितरण थांबवावे आणि त्यातील मजकूर बदनामीकारक घोषित करावा, अशी विनंती न्यायालयाला केली आहे.
आर्यन खान आणि खंडणीचा जुना वाद
मे 2023 मध्ये, केंद्रीय अन्वेषण ब्युरोने (CBI) समीर वानखेडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. आर्यन खान संबंधित 2021 मधील क्रूझ जहाज ड्रग्ज चौकशीदरम्यान शाहरुख खानकडून 25 कोटी रुपये उकळण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवला होता. समीर वानखेडे यांनी हे आरोप फेटाळून लावले असून ते राजकीयदृष्ट्या प्रेरित असल्याचे म्हटले आहे.