भारतामध्ये सोने खरेदी आणि गुंतवणुकीला मोठे महत्त्व आहे. त्यामुळे दुबईमध्ये तुलनेने कमी दरात आणि शुद्धतेच्या हमीसह मिळणारे सोने भारतीय प्रवाशांमध्ये नेहमीच लोकप्रिय राहिले आहे. मात्र दुबईहून परतताना किती सोने भारतात आणता येते आणि त्यावर किती सीमाशुल्क भरावे लागते याबाबत सरकारने स्पष्ट नियम ठरवले आहेत. या नियमांचे पालन न केल्यास दंडाची कारवाई आणि सोन्याची जप्ती होऊ शकते.
केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळानुसार भारतीय प्रवासी परदेशात किमान सहा महिने राहिल्यानंतर जास्तीत जास्त एक किलोग्राम सोने सामानात घेऊन येऊ शकतात. हे सोने Bars, Coins किंवा दागिन्यांच्या स्वरूपात असू शकते. मात्र हे सर्व सोने सीमाशुल्क विभागाला योग्य प्रकारे जाहीर करणे आवश्यक आहे. पुरुषांना 20 ग्रॅम आणि महिलांना 40 ग्रॅम सोने ड्युटी-फ्री आणण्याची परवानगी आहे. पुरुषांना 50000 रुपये आणि महिलांना 100000 रुपये मूल्य मर्यादा लागू होते. मुलांना 15 वर्षाखालील असल्यास 40 ग्रॅम सोने दागिन्यांच्या किंवा भेटवस्तूंच्या स्वरूपात आणता येते. या मर्यादेपेक्षा जास्त सोने आणल्यास संबंधित प्रमाण आणि मूल्यावर सीमाशुल्क आकारले जाते.
हेही वाचा: Ravindra Chavan: दिल्लीत रात्री उशिरा राजकीय हालचाली; चव्हाण-शहा भेटीत निवडणूक रणनीतीवर मोठा निर्णय?
ड्युटी-फ्री मर्यादेपेक्षा जास्त सोने आणणाऱ्या प्रवाशांना Red Channel मध्ये जाऊन सोने आणि त्याची खरेदी पावती जाहीर करणे आवश्यक आहे. पुरुषांसाठी 20 ते 50 ग्रॅमपर्यंत 3 टक्के आणि 100 ग्रॅमपेक्षा जास्त सोने असल्यास 10 टक्के सीमाशुल्क लागू होते. महिलांसाठी 40 ते 100 ग्रॅमपर्यंत 3 टक्के आणि 200 ग्रॅमपेक्षा जास्त असल्यास 10 टक्के कर भरावा लागतो. प्रवाशाने परदेशात एक वर्षांपेक्षा जास्त वास्तव्य केले असल्यास सामानातील दागिन्यांसाठी पुरुषांना 20 ग्रॅम आणि महिलांना 40 ग्रॅम ड्युटी-फ्री परवानगी आहे. परंतु परदेशातून खरेदी केलेले नवीन दागिने घातले असले तरी आगमनावेळी ते जाहीर करणे आवश्यक आहे.
प्रवासादरम्यान घातलेले जुने दागिने मात्र नियमांनुसार ड्युटी-फ्री मानले जातात. सोन्याच्या पट्ट्या किंवा नाण्यांसाठी खरेदी पावत्या आणि शुद्धतेचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. पावत्या नसल्यास सीमाशुल्क विभाग सोने जप्त करू शकतो. तसेच सोने जाहीर न करता आणण्याचा प्रयत्न केल्यास ते स्मगलिंग मानले जाते आणि कडक दंडात्मक कारवाई केली जाते.
सीमाशुल्क नियमांची अचूक माहिती असल्यास प्रवासी सोने खरेदी आणि वाहतूक अधिक सुरक्षित आणि नियमबद्ध पद्धतीने करू शकतात. त्यामुळे परदेशात जाताना आणि परतताना खरेदी पावत्या, वजनाचा तपशील आणि शुद्धतेची माहिती सोबत ठेवणे महत्त्वाचे आहे.
हेही वाचा: Illegal Exchange Racket: दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई; 3.5 कोटींच्या जुन्या नोटांसह चौघांना अटक