बीड : जिल्ह्यातील संतोष देशमुख हत्या प्रकरणातील चार आरोपी आज केज न्यायालयात हजर झाले आहेत. न्यायालयात आज किती दिवसांची पोलीस कोठडी मिळवावी की न्यायालयीन कोठडी मिळवावी याबाबत सुनावणी सुरू होणार आहे. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. काहीच वेळात सुनावणीला सुरुवात होणार आहे.
आरोपीच्या वकिलाने पोलिसांकडून प्रश्न केला आहे की, इतक्या दिवसांमध्ये पोलिसांनी काय केलं? 'आता पोलीस कोठडी मागण्याचे कारण काय आहे? पोलिसांकडे एक तरी कारण आहे का?' असे आरोपीचे वकील, अॅड. तिडके यांनी कोर्टात म्हटले आहे. त्यांनी मागच्या वीस दिवसांमध्ये पोलिसांनी काय केले याबाबत उत्तर कोर्टाला द्यावे, असे सुद्धा ते म्हणाले.
शासकीय वकिलांनी आपल्या युक्तिवादात सांगितले की, संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आणखी एक आरोपी, कृष्णा आंधळे याला शोधायचे आहे. आरोपी कृष्णा आंधळे ला शोधण्यासाठी पोलीस शोध घेत आहेत. याशिवाय, तपासात नव्या बाबी निष्पन्न होत आहेत. कृष्णा आंधळे सापडल्यानंतर सर्व आरोपींना समोरासमोर बसून चौकशी करणे गरजेचे आहे. पोलीस याला समजून घेऊन तपास करत आहेत की कृष्णा आंधळे कोणाच्या मदतीने फरार आहे.
तसेच, डॉ. वायबसे आणि त्यांच्या बायकोचे काल चौकशी करण्यात आली आहे. या चौकशीमधून माहिती मिळवली जात आहे की, हा कट कसा रचला आणि नेमकं काय झालं हे तपासले जात आहे.
आरोपीच्या वकिलांनी मात्र आरोप केला आहे की, या सर्व प्रक्रियेतील राजकीय आणि सामाजिक दबावामुळे ही सर्व घडामोडी घडत आहेत. मीडिया ट्रायलच्या माध्यमातून हे आरोप होत आहेत, अशी त्यांची प्रतिक्रिया आहे.
खंडणी प्रकरणातील आरोपी आणि हत्या प्रकरणातील आरोपी विष्णू चाटे याची सुनावणी सुरू झाली आहे. सीआयडीचे तपास अधिकारी अनिल गुजर यांनी मांडणी केली. त्यांनी सांगितले की, हे सर्व गुन्हे एकमेकांशी सलग्न आहेत आणि त्यासाठी तपासणी करणे अत्यंत आवश्यक आहे. आरोपी विष्णू चाटे यांच्याशी संबंधित अन्य गुन्ह्यांची तपासणी करायची आहे. तसेच, ज्या आरोपींनी माहिती दिली आहे, त्यांचा डेटा घेतला जाणार आहे.
काही दिवसांपूर्वी सुदर्शनला अटक करण्यात आली होती. पोलिसांनी आता घुलेला आणि इतर सर्व आरोपींना समोरासमोर बसून चौकशी करण्याची मागणी केली आहे. विष्णू चाटे यांना सात दिवसांची पोलीस कोठडी दिली जावी, अशी मागणी अनिल गुजर यांनी केली.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील तीन आरोपींना 18 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. प्रतीक घुले, जयराम चाटे आणि महेश केदार यांचा समावेश आहे. विष्णू चाटे यांच्या कोठडी संदर्भात काही वेळात निर्णय होईल.त्याआधी विष्णू चाटे यांना सात दिवसांची पोलीस कोठडी द्या अशी मागणी अनिल गुजर यांनी केली आहे.