मुंबई: देशातील सोन्याच्या दरांमध्ये सध्या घसरणीचा कल कायम असल्याचे दिसून येत आहे. आज 14 मार्चच्या सकाळी राजधानी दिल्लीमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर घसरून 1,60,830 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आला आहे. तर मुंबईमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर 1,60,680 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका नोंदवला गेला. जागतिक आर्थिक घडामोडी, डॉलरची मजबुती आणि मध्यपूर्वेतील तणावामुळे सोन्याच्या बाजारात अस्थिरता कायम आहे.
याआधीच्या व्यवहार सत्रात दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली होती. सोन्याचा दर 2,000 रुपयांनी म्हणजेच सुमारे 1.21 टक्क्यांनी कमी होऊन 1,65,200 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आला होता. तज्ज्ञांच्या मते, अमेरिकन डॉलर मजबूत होत असल्याने आणि जागतिक मौद्रिक धोरणाबाबत अनिश्चितता वाढल्याने सोन्याच्या किमतींवर दबाव निर्माण झाला आहे.
पश्चिम आशियातील वाढत्या संघर्षामुळे कच्च्या तेलाच्या किमतींमध्येही मोठी वाढ होत आहे. त्यामुळे जागतिक स्तरावर महागाई वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या परिस्थितीत विविध देशांच्या केंद्रीय बँकांना दीर्घकाळ कडक आर्थिक धोरण कायम ठेवावे लागू शकते, असा अंदाज अर्थतज्ज्ञ व्यक्त करत आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात सध्या हाजिर सोन्याचा दर सुमारे 5,088 डॉलर प्रति औंस इतका नोंदवला गेला आहे.
देशातील विविध शहरांमध्येही सोन्याच्या दरांमध्ये थोडाफार फरक दिसून येतो. दिल्ली, जयपूर, लखनौ आणि चंदीगड येथे 22 कॅरेट सोन्याचा दर 1,47,440 रुपये प्रति 10 ग्रॅम असून 24 कॅरेट सोन्याचा दर 1,60,830 रुपये आहे. मुंबई, कोलकाता, चेन्नई आणि हैदराबाद येथे 22 कॅरेट सोने 1,47,290 रुपये तर 24 कॅरेट सोने 1,60,680 रुपये प्रति 10 ग्रॅम दराने विकले जात आहे. अहमदाबाद आणि भोपाळमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 1,47,340 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 1,60,730 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका नोंदवला गेला आहे.
दरम्यान, दुसरी महत्त्वाची मौल्यवान धातू असलेली चांदी देखील सतत स्वस्त होत असल्याचे दिसत आहे. 14 मार्चच्या सकाळी चांदीचा दर 2,79,800 रुपये प्रति किलोग्रामवर आला आहे. याआधी दिल्लीच्या सराफा बाजारात चांदीच्या किमतीत 11,000 रुपयांची म्हणजेच सुमारे 3.97 टक्क्यांची घसरण झाली होती आणि दर 2,65,500 रुपये प्रति किलोग्रामवर आला होता.
आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीचा ताजा दर सध्या सुमारे 83.14 डॉलर प्रति औंस आहे. विशेष म्हणजे याच वर्षाच्या जानेवारी महिन्यात चांदीचा दर तब्बल चार लाख रुपये प्रति किलोग्रामच्या पातळीवर पोहोचला होता. त्यामुळे सध्याची घसरण ही गुंतवणूकदारांसाठी संधी मानली जात असली तरी जागतिक परिस्थिती लक्षात घेता आगामी काळात दरांमध्ये पुन्हा चढ-उतार होण्याची शक्यता तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.