Gold Silver Rate Today: गेल्या आठवड्यात सोन्या-चांदीच्या बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात चढ-उतार पाहायला मिळाले. जरी आठवड्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी या दोन्ही मौल्यवान धातूंच्या किमतीत किरकोळ वाढ झाली असली, तरी संपूर्ण आठवड्याचा विचार करता सोने आणि चांदी दोन्ही स्वस्त झाले आहेत. 'मल्टी कमोडिटी एक्सचेंज'वर (MCX) शुक्रवारी व्यवहाराअंती चांदीच्या दरात प्रति किलो 2,808 ची वाढ झाली, तर सोन्याच्या दरातही किंचित सुधारणा झाली. मात्र, साप्ताहिक आढावा घेता ग्राहकांसाठी हे धातू अधिक परवडणारे झाले आहेत.
5 दिवसांत चांदीच्या दरात 12,821 ची मोठी घट
साप्ताहिक आकडेवारीनुसार, सोमवार ते शुक्रवार या 5 दिवसांच्या कालावधीत चांदीच्या दरात 12,821 ची मोठी घसरण नोंदवण्यात आली. 17 एप्रिल रोजी चांदीचा दर प्रति किलो 2,57,142 इतका होता, जो शुक्रवारी 2,44,321 वर बंद झाला. विशेष म्हणजे, या वर्षाच्या सुरुवातीला चांदीने उच्चांक गाठला होता. जानेवारी महिन्यात चांदी प्रति किलो 4,39,337 पर्यंत पोहोचली होती, त्या तुलनेत आता चांदीच्या किमतीत एकूण 1,95,016 ची घट झाली आहे. 'IBJA' च्या माहितीनुसार, शुक्रवारी चांदीचा दर 2,43,825 च्या पातळीवर होता.
सोन्याचे दर 5 दिवसांत 1,800 ने घसरले
चांदीप्रमाणेच सोन्याच्या दरातही गेल्या 5 दिवसांत 1,810 ची घसरण झाली आहे. 17 एप्रिल रोजी सोन्याचा बंद भाव प्रति 10 ग्रॅम 1,54,609 होता, जो शुक्रवारी 1,52,799 वर आला. सोन्याच्या ऐतिहासिक दराशी तुलना केल्यास, जानेवारी महिन्यात सोन्याने 2,00,000 चा टप्पा ओलांडला होता, तिथून आतापर्यंत सोन्याच्या दरात एकूण 50,185 ची घट झाली आहे. सध्या देशांतर्गत बाजारपेठेत 24-कॅरेट सोन्याचा दर 1,51,475 च्या आसपास स्थिरावला आहे.
GST आणि घडणावळीच्या शुल्काचा ग्राहकांवर भार
बाजारपेठेतील सोन्या-चांदीचे दर हे मूळ दर असतात. मात्र, प्रत्यक्ष दागिने खरेदी करताना ग्राहकांना त्यावर 3 टक्के GST आणि संबंधित सराफाचे घडणावळीचे शुल्क (Making Charges) द्यावे लागते. हे घडणावळीचे शुल्क प्रत्येक राज्यानुसार आणि ज्वेलर्सनुसार वेगवेगळे असते, त्यामुळे दागिन्यांची अंतिम किंमत ही बाजारभावापेक्षा थोडी जास्त असते. सोन्याच्या किमतीत झालेली ही साप्ताहिक घट आगामी सण आणि लग्नसराईच्या पार्श्वभूमीवर खरेदीदारांसाठी दिलासादायक ठरू शकते.