Holi 2026 : शिर्डी साईबाबांच्या भक्तांसाठी होळी आणि फाल्गुन पौर्णिमेचा दिवस अत्यंत पवित्र मानला जातो. या दिवशी श्री साईसच्चरितातील 40 व्या अध्यायाचे वाचन करणे केवळ शुभच नाही, तर अचिंत्य फळ (ज्याचा कधी विचारही केला नव्हता असे फळ) देणारे मानले जाते. या अध्यायाचा होळीशी असलेला ऐतिहासिक आणि आध्यात्मिक संबंध भक्तांची श्रद्धा अधिक दृढ करणारा आहे.
अध्याय 40 आणि होळीचा विशेष संदर्भ
श्री साईसच्चरिताच्या 40 व्या अध्यायात बाबांनी आपल्या भक्ताला दिलेल्या शब्दाची पूर्तता केल्याची सुंदर कथा आहे. बाबांनी याच श्री साईसच्चरित्राचे लेखक हेमाडपंत म्हणजेच, गोविंद रघुनाथ दाभोळकर यांना स्वप्नात दृष्टांत देऊन सांगितले होते की, "आज मी तुझ्या घरी जेवायला येणार आहे." विशेष म्हणजे, तो दिवस होळीचाच होता. त्यांनी आणि त्यांच्या कुटुंबाने लगेच बाबांच्या स्वागतासाठी तयारी केली होती. बाबांसाठी नैवेद्य वाढला होता. जरी बाबा प्रत्यक्ष शरीराने आले नाहीत, तरी ते एका मूर्तीच्या रूपात तेथे येऊन पोहोचले. या अढळ भक्तानेही मूर्ती रूपात माझे बाबाच तिथे प्रकट झाले असा पूर्ण विश्वास ठेवला. ही कथा आपल्याला शिकवते की, बाबा आपल्या शब्दाचे पक्के असून ते कोणत्याही रूपात भक्ताकडे येऊ शकतात. तसेच, संकटसमयीही भक्ताच्या हाकेला धावून येतात.
नैवेद्य, तृप्ती आणि अन्नावर आशीर्वादाचा वर्षाव
होळीच्या दिवशी महाराष्ट्रात पुरणपोळीचा नैवेद्य दाखवण्याची परंपरा आहे. 40 व्या अध्यायातही बाबांनी भक्ताच्या घरचा नैवेद्य स्वीकारल्याचा उल्लेख असल्याने, या दिवशी या अध्यायाचे पठण केल्यास घरातील अन्नाला बाबांचा आशीर्वाद लाभतो. यामुळे घरात कधीही धान्याची कमतरता भासत नाही आणि घरातील नकारात्मकता दूर होऊन चैतन्य निर्माण होते, अशी भक्तांची गाढ श्रद्धा आहे. हा अध्याय वाचल्याने मनातील संशय दूर होऊन 'श्रद्धा आणि सबुरी' हे गुण अंगी बाणण्यास मदत होते.
हेही वाचा - Holi 2026 : नारळ सगळ्या घरातून फिरवून होळीत का अर्पण करतात? 'हे' आहे या प्रथेमागचं कारण
वाचन करण्याची पद्धत
होळीच्या दिवशी या अध्यायाचे शुभफळ मिळवण्यासाठी खालीलप्रमाणे कृती करावी:
- शुद्धता: सकाळी किंवा संध्याकाळी स्नान करून शुद्ध मनाने बाबांच्या प्रतिमेसमोर दिवा लावावा.
- नैवेद्य: बाबांना एखादे फूल अर्पण करावे. अगरबत्ती आणि दिवा लावावा. आणि शक्य असल्यास पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण करावा.
- पठण: अत्यंत श्रद्धापूर्वक विश्वासाने श्री साईसच्चरितातील 40 व्या अध्यायाचे पूर्ण वाचन करावे.
- आरती: वाचन पूर्ण झाल्यावर बाबांची आरती करून मनोभावे प्रार्थना करावी. तसेच, साईबाबांची 9 वचनेही वाचावीत.
संकटात बाबांचे रक्षण
असे मानले जाते की, जो भक्त होळीच्या शुभ मुहूर्तावर या अध्यायाचे पठण करतो, साईबाबा त्याच्या सर्व संकटात पाठीशी उभे राहतात. होळी हा सण वाईट प्रवृत्तींचा नाश करण्याचा सण असल्याने, या अध्यायातील बोध भक्ताच्या जीवनातील अंधकार दूर करून सुखाचा प्रकाश आणतो. म्हणूनच शिर्डीसह जगभरातील साईभक्त होळीच्या दिवशी या अध्यायाला विशेष महत्त्व देतात.
हेही वाचा - Holika Dahan Puja Samagri List: होळीच्या पूजेसाठी कोणत्या वस्तू आवश्यक? पहा पूजा साहित्याची संपूर्ण यादी एका क्लिकवर
(Disclaimer : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. जय महाराष्ट्र त्याची हमी देत नाही.)