Mumbai Pune Expressway Accident: मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर खोपोली-खालापूर दरम्यान किलोमीटर 36 जवळ मुंबई वाहिनीवर दुपारी एक अत्यंत भीषण अपघात घडला. तीव्र उतारावरून जात असताना फेविकॉल व तत्सम ॲडेसिव्ह केमिकल वाहून नेणाऱ्या ट्रकचे अचानक ब्रेक निकामी झाले. चालकाचे नियंत्रण सुटल्याने या भरधाव ट्रकने समोर चाललेल्या पिकअप व्हॅनला आणि त्यानंतर महिंद्रा कंपनीच्या चारचाकी गाड्या घेऊन जाणाऱ्या कंटेनरला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, मध्यभागी असलेली पिकअप व्हॅन पूर्णपणे चिरडली जाऊन तिचा अक्षरशः चुराडा झाला. या घटनेत एकाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे.
जखमींवर तातडीने उपचार
अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस, आयआरबीची देवदूत यंत्रणा आणि स्थानिक आपत्कालीन पथकाने घटनास्थळी धाव घेतली. अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीला तातडीने रुग्णवाहिकेद्वारे जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. धडकेमुळे केमिकलचा ट्रक फुटल्याने महामार्गाच्या लेनवर मोठ्या प्रमाणात चिकट व घसरडे ॲडेसिव्ह द्रव सांडले होते. त्यामुळे इतर वाहने घसरण्याचा धोका निर्माण झाला होता. पोलीस आणि आपत्कालीन यंत्रणेने तत्परता दाखवत रस्त्यावरील केमिकल हटवून आणि माती टाकून रस्ता सुरक्षित करण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेतले.
हेही वाचा –Buldhana: ‘तक्रार घेण्यास टाळाटाळ?’ आदिवासी समाजाचा पोलीस ठाण्यात ठिय्या; नेमकं प्रकरण काय?
अपघातग्रस्त वाहने हटवून वाहतूक पूर्ववत
या विचित्र तीन वाहनांच्या अपघातामुळे मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या लेनवर काही काळ वाहतुकीचा खोळंबा झाला आणि वाहनांच्या रांगा लागल्या. महामार्ग पोलिसांनी क्रेनच्या साहाय्याने चुराडा झालेली पिकअप व्हॅन, कंटेनर आणि केमिकलचा ट्रक बाजूला घेत वाहतूक सुरळीत केली. महामार्गावरील ब्रेक फेल्युअरच्या घटना रोखण्यासाठी सुरक्षिततेचे नियम पाळण्याचे आवाहन वाहतूक पोलिसांकडून करण्यात आले आहे.