मुंबई : चीनमध्ये वेगाने पसरणाऱ्या नव्या विषाणूच्या पार्श्वभूमीवर भारतात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत आज आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषद घेतली आणि नागरिकांना भीती न बाळगण्याचे आवाहन केले. दोन्ही मंत्र्यांकडून स्पष्ट करण्यात आले की, या विषाणूचा धोका गंभीर नाही आणि यावर योग्य उपचार देण्याचे निर्देश संबंधित आरोग्य यंत्रणांना दिले आहेत.
आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी सांगितले की, हा विषाणू पूर्वीपासून अस्तित्वात आहे आणि त्याचा धोका फार गंभीर नाही. त्यांनी सांगितले की, 2024 फेब्रुवारी ते डिसेंबर दरम्यान चाचण्या घेण्यात आल्या होत्या, ज्यामध्ये या आजाराचे गंभीर परिणाम दिसले नाहीत. त्याऐवजी, त्यांनी सर्व नागरिकांना आरोग्य विभागाच्या सेवा आणि उपाययोजनांवर विश्वास ठेवण्याचे सांगितले. तसेच, कोरोना महामारीच्या अनुभवावरून त्यांनी नागरिकांना अनावश्यक भीती न बाळगण्याचे आवाहन केले.
वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी या विषाणूबाबत अजून कोणतीही गाईडलाइन केंद्र सरकारने दिलेली नसल्याचे सांगितले. त्याचबरोबर, या विषाणूला "सौम्य" स्वरूपाचा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आणि सांगितले की, चीनमध्ये त्याचे प्रमाण वाढल्यामुळे काळजी वाढली होती, परंतु घाबरण्याचे कोणतेही कारण नाही.
एचएमपीव्ही विषाणू संदर्भात घाबरण्याचे कारण नाही; काळजी घ्या
सर्व अधिष्ठातांनी सतर्क रहावे मंत्रालयाचे आदेश
एचएमपीव्ही (ह्यूमन मेटा न्यूमोनिया व्हायरस) विषाणूचा प्रभाव काही देशांमध्ये दिसून आलेला आहे, मात्र आपल्या देशात तो गंभीर धोक्याचा नाही. सध्या कर्नाटका, तामिळनाडू आणि गुजरातमध्ये पाच रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी एक रुग्ण पूर्णपणे बरा होऊन घरी गेला आहे, आणि उर्वरित रुग्ण बरे होत आहेत. ह्या विषाणूपासून लहान मुलं, वृद्ध व इतर गंभीर आजार असणाऱ्यांनी विशेष काळजी घ्यावी.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, राज्यात एचएमपीव्ही विषाणूच्या प्रकरणांची नोंद नाही. राज्य सरकार लवकरच मार्गदर्शक तत्त्वे जारी करेल आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरु करेल. नागरिकांना खोकला, शिंकणे आणि सर्दी- पडश्याची लक्षणे असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेण्याचे व सार्वजनिक ठिकाणांपासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
स्वास्थ्य विभागाचे सचिव निपुन विनायक यांनी सांगितले की, या विषाणूबाबत अद्याप कोणतेही ठोस निर्देश दिले गेलेले नाहीत. त्यांनी नागरिकांना संयम राखण्याचे आणि कोणतीही अफवा पसरवू नये असे सूचित केले.
संपूर्ण राज्यात आरोग्य यंत्रणा सज्ज असून, नागरिकांनी भीती न बाळगता सुरक्षित राहण्याचे आवाहन आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी केले आहे.