अमेरिका-इराण युद्ध काही थांबायचं नाव घेत नाही आहे. अशातच आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जगाला हादवरून टाकणारा आदेश दिला आहे. त्यांच्या या आदेशामुळे युद्धाचा मोठा भडका उडण्याची शक्यता आहे. अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे की, त्यांनी अमेरिकेच्या नौदलाला होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये सुरुंग पेरणाऱ्या कोणत्याही इराणी बोटीला गोळ्या घालून नष्ट करण्याचा आदेश दिला आहे. या निर्णयामुळे दोन्ही देशांमधील नाजूक शस्त्रसंधी धोक्यात येऊ शकते.
काय दिला आदेश?
ट्रम्प म्हणाले की, "मी अमेरिकेच्या नौदलाला आदेश दिला आहे की, होर्मुझच्या सामुद्रधुनीच्या पाण्यात सुरुंग पेरणाऱ्या कोणत्याही बोटीला, मग त्या लहान असल्या तरी, गोळ्या घालून नष्ट करावे यात कोणताही संकोच चालणार नाही," असे ट्रम्प यांनी एका सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिले.
याव्यतिरिक्त, आमची सुरुंग शोधक जहाजे सध्या सामुद्रधुनी साफ करत आहेत . मी याद्वारे आदेश देत आहे की, ही कार्यवाही सुरू ठेवावी. इराणच्या अधिकाऱ्यांनी वारंवार आश्वासन दिले आहे की, त्यांचा देश स्वतःचे संरक्षण करेल आणि अमेरिकेच्या कोणत्याही हल्ल्याला प्रत्युत्तर देईल.
युद्धापूर्वी अखंडपणे खुले असलेले होर्मुझ, या युद्धात वादाचा एक प्रमुख मुद्दा बनले आहे. अमेरिका-इस्रायलच्या लष्करी मोहिमेला प्रत्युत्तर म्हणून इराणने सामुद्रधुनी बंद केली होती. होर्मुझ बंद झाल्यामुळे तेलाच्या किमती वाढल्या आहेत, ज्यामुळे अमेरिकेत ट्रम्प यांच्यावर राजकीय दबाव आला आहे; तिथे संघर्षापूर्वी 3 डॉलर असलेली एक गॅलन (3.8 लिटर) पेट्रोलची किंमत आता 4 डॉलरच्या वर गेली आहे.