Saturday, June 06, 2026 09:42:39 AM

Iran-US Tension: 'होर्मुझची सामुद्रधुनी अमेरिकाच बंद करतेय...'; इराणच्या सर्वोच्च प्रतिनिधींची अमेरिकेवर बोचरी टीका

एकेकाळी 'होर्मुझची सामुद्रधुनी' (Strait of Hormuz) खुली ठेवण्यासाठी आग्रही असणारी अमेरिका आता स्वतःच ती बंद करण्याच्या दिशेने पावले उचलत असल्याचा आरोप होत आहे.

iran-us tension होर्मुझची सामुद्रधुनी अमेरिकाच बंद करतेय इराणच्या सर्वोच्च प्रतिनिधींची अमेरिकेवर बोचरी टीका

Iran-US Tension:  अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव आता एका नव्या वळणावर येऊन पोहोचला आहे. एकेकाळी 'होर्मुझची सामुद्रधुनी' (Strait of Hormuz) खुली ठेवण्यासाठी आग्रही असणारी अमेरिका आता स्वतःच ती बंद करण्याच्या दिशेने पावले उचलत असल्याचा आरोप होत आहे. या पार्श्वभूमीवर, भारतातील इराणच्या सर्वोच्च नेत्यांचे प्रतिनिधी डॉ. अब्दुल माजिद हकीम इलाही यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या भूमिकेवर तीव्र आश्चर्य व्यक्त केले आहे. अमेरिकेचा नेमका इरादा काय आहे, हे अद्याप स्पष्ट नसल्याचे नमूद करत त्यांनी अमेरिकेच्या दुटप्पी धोरणावर सडकून टीका केली आहे.

इराणकडून नवीन आणि गुप्त शस्त्रास्त्रांच्या तैनातीचा इशारा
दुसरीकडे, इराणच्या 'इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स'ने (IRGC) अमेरिका आणि इस्रायलला गंभीर इशारा दिला आहे. IRGC चे प्रवक्ते हुसेन मोहब्बी यांनी स्पष्ट केले की, जर हा संघर्ष असाच सुरू राहिला, तर इराण आपल्या अशा लष्करी क्षमता आणि शस्त्रास्त्रांची तैनाती करेल, ज्यांची शत्रूला सध्या पुसटशी कल्पनाही नाही. "आम्ही अद्याप आमच्या पूर्ण शक्तीचा वापर केलेला नाही," असे म्हणत त्यांनी भविष्यातील आक्रमक पवित्रा अधोरेखित केला आहे.

हेही वाचा -  Strait of Hormuz Blockade : इराणची नाकेबंदी! अमेरिकेने होर्मुझच्या समुद्रात तैनात केल्या 15 युद्धनौका आणि अत्याधुनिक फायटर जेट्स

लष्करी सामग्रीचा पुरेसा साठा आणि वाढती क्षमता
इराणच्या संरक्षण मंत्रालयाने आपल्या सशस्त्र दलांच्या वाढत्या ताकदीचा पुनरुच्चार केला आहे. प्रवक्ते रजा तलाई-निक यांनी ठामपणे सांगितले की, भविष्यात कोणत्याही प्रकारच्या आक्रमक किंवा बचावात्मक मोहिमा राबवण्यासाठी इराण सज्ज आहे. इराणकडे सध्या आधुनिक क्षेपणास्त्रे, ड्रोन, प्रगत शस्त्रास्त्रे आणि दारूगोळ्याचा पुरेसा साठा उपलब्ध असून, त्यांच्या लष्करी क्षमतांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. या जागतिक घडामोडींमुळे सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावर चिंतेचे आणि अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले आहे.


सम्बन्धित सामग्री