Friday, February 13, 2026 10:03:33 AM

Jalgaon Election : करुणा मुंडे सत्ताधाऱ्यांवर संतापल्या, 'कसलीच लाज लज्जा..',

स्वराज्यशक्ती सेनेच्या प्रमुख करुणा मुंडे यांनी जळगावमध्ये परिवर्तनाची खूप गरज असल्याचे म्हटले आहे. तसेच, सत्ताधाऱ्यांनी गुंड प्रवृत्तीच्या आणि गुन्हेगारांना उमेदवारी दिल्यावरून संताप व्यक्त केला.

jalgaon election  करुणा मुंडे सत्ताधाऱ्यांवर संतापल्या कसलीच लाज लज्जा

Jalgaon Election : महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जळगावमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. स्वराज्यशक्ती सेनेच्या प्रमुख करुणा मुंडे यांनी सत्ताधारी भाजप आणि शिंदे गटावर घणाघाती टीका केली आहे. जळगावमध्ये परिवर्तनाची नितांत गरज असल्याचे सांगत त्यांनी सत्ताधाऱ्यांनी गुंड प्रवृत्तीच्या आणि तडीपार लोकांना उमेदवारी दिल्याचा दावा केला. "सत्ताधारी लोकांना आता लोकांची लाज लज्जा काही उरली नाहीये," अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला. जळगावमधील मूलभूत सुविधांच्या अभावावरून त्यांनी सरकारला धारेवर धरले.

जळगावच्या विकासाबाबत बोलताना त्यांनी रस्ते, गटारे, वीज आणि पाणी यांसारख्या मूलभूत प्रश्नांचा पाढा वाचला. जिल्ह्यात ड्रग्ज माफिया आणि गुंडगिरी वाढत असल्याचा आरोप करत त्यांनी परिवर्तनाचे आवाहन केले. जळगावमध्ये 4 मंत्री असतानाही विजेच्या तारांचे जाळे आणि घाणीचे साम्राज्य कायम आहे, ही शरमेची बाब असल्याचे त्या म्हणाल्या. त्यांनी असा दावा केला की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता पंतप्रधान बनण्याचे स्वप्न बघत आहेत. मात्र, 'मी त्यांना इथले प्रश्न सोडवल्याशिवाय, पंतप्रधान होऊ देणार नाही,' असा जोरदार हल्लाबोल त्यांनी केला.

'लाडकी बहीण' योजनेवरून थेट सवाल
करुणा मुंडे यांनी महायुती सरकारच्या 'लाडकी बहीण' योजनेवर कडाडून प्रहार केला. त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट आव्हान देत म्हटले की, "देवेंद्र भाऊ, मी तुमच्या पत्नीला 1000 रुपये देते, तुम्ही त्यात घर चालवून दाखवा." महिलांना 1500 रुपयांचे आमिष दाखवून त्यांना दिवसभर रांगेत उभे केले जाते, ज्यामुळे त्यांची 500 रुपयांची रोजंदारी बुडते, असा आरोप त्यांनी केला. या योजनेचा लाभ केवळ सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या नातेवाईकांनाच मिळत असून खऱ्या गरजू महिला वंचित असल्याचे त्यांनी नमूद केले.

हेही वाचा - BMC Election 2026: भाजप - एमआयएम युतीवर शिंदेंनी सोडले मौन; स्पष्टचं म्हणाले मुख्यमंत्र्यांसोबतच्या त्या चर्चेनंतर...

दबाव तंत्र आणि उमेदवारांची पळवापळवी
जळगाव महापालिका निवडणुकीसाठी स्वराज्यशक्ती सेनेने 15 उमेदवार उभे केले होते, मात्र त्यापैकी 2 उमेदवारांनी माघार घेतली. यावर भाष्य करताना करुणा मुंडे म्हणाल्या की, सत्ताधारी पक्षाने 10 लाख रुपयांच्या ऑफर्स देऊन आणि दबाव तंत्राचा वापर करून आमच्या उमेदवारांना फोडले आहे. सत्तेचा आणि पैशाचा असा नंगानाच जळगावमध्ये सुरू असून, लोकशाही वाचवण्यासाठी आपण स्वतः गल्लीबोळात फिरून प्रचार करत असल्याचे त्यांनी सांगितले. उमेदवारांना धमकावले जात असताना आपण त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 15 जानेवारी 2026 रोजी होणाऱ्या मतदानात जनता या भ्रष्ट कारभाराला चोख उत्तर देईल, अशी खात्री करुणा मुंडे यांनी व्यक्त केली.

 

हेही वाचा - BMC Election 2026: 'लाव रे तो व्हिडिओ'ला भाजपचं 'काढ रे तो फोटो'ने उत्तर; अमित साटम राज ठाकरेंना म्हणाले ढोंगी आणि ...


सम्बन्धित सामग्री