पुणे : पुण्यातील दिवसेंदिवस गुन्हेगारी कारवाया वाढत चालल्या आहेत. येथे कायदा आणि सुव्यवस्थेची भीती कुणाला राहिलेली नाही. याबाबतची खंत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी एक्स पोस्टद्वारे व्यक्त केली. पुण्यातील कात्रज ते नवले ब्रिज महामार्गावर काल, सोमवारी सकाळी एका रिक्षाचालकाला बेदम मारहाण करण्यात आली. हा व्हिडीओ रोहित पवार यांनी पोस्ट केला असून या घटनेवरून चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, पुण्यात महाराष्ट्राच्या कायदा व सुव्यवस्थेवर भर दिवसा, गजबजलेल्या रस्त्यात कोयत्याने सपासप वार होतायेत, पण तरीही घाबरू नका! कारण महाराष्ट्र सरकार ‘सक्षम’ आणि ‘कार्यक्षम’ आहे!.
पुण्यात महाराष्ट्राच्या कायदा व सुव्यवस्थेवर भर दिवसा, गजबजलेल्या रस्त्यात कोयत्याने सपासप वार होतायेत, पण तरीही घाबरू नका! कारण महाराष्ट्र सरकार 'सक्षम' आणि 'कार्यक्षम' आहे! pic.twitter.com/8ht2i8C28u — Rohit Pawar (@RRPSpeaks) May 19, 2026
काय आहे घटना
पुण्यात प्रवासी भरण्याच्या वादातून एका रिक्षाचालकावर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रवाशांची ने-आण करण्याच्या जुन्या कारणावरून झालेल्या वादाचे रुपांतर थेट जीवघेण्या हल्ल्यात झाले. तीन रिक्षाचालकांनी मिळून आपल्याच एका सहकाऱ्यावर धारदार शस्त्राने हल्ला चढवला आणि त्यानंतर त्याला थेट पुलावरून खाली फेकून दिले. या थरारक घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सूरज माणिक काळे (वय 30) असे मारहाण झालेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे. दोन ते तीन वर्षांपूर्वी प्रवाशांना रिक्षात बसवण्यावरून सूरज यांचे अन्य रिक्षाचालकांशी खटके उडाले होते. याच जुन्या वादाची खुन्नस मनात ठेवून सोमवारी सकाळी 10.15 वाजण्याच्या सुमारास दत्तनगर चौकात आरोपींनी सूरज यांना गाठले. त्या तिघांनी आपल्या जवळील धारदार हत्याराने सुरज यांच्यावर सपासप वार केले. गंभीर जखमी झालेल्या सूरज यांना राजमाता भुयारी मार्गावरून थेट खाली फेकून दिले. याप्रकरणी पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतले आहे.