Avinash Abhyankar on Bihar Bhavan : मुंबईत प्रस्तावित असलेल्या बिहार भवनाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) तीव्र विरोध दर्शवला आहे. बिहारच्या एका मंत्र्याने "राज ठाकरे कोण आहेत?" असा प्रश्न विचारल्यानंतर मनसे नेते अविनाश अभ्यंकर यांनी त्यांना चोख प्रत्युत्तर दिले. अभ्यंकर म्हणाले की, राज ठाकरे ही ती व्यक्ती आहे ज्यांनी वयाच्या 38 व्या वर्षी स्वतंत्र पक्ष काढला आणि पंतप्रधान मोदींच्या आग्रहास्तव शिवतीर्थावरून देशाला संबोधित केले. मराठी माणसासाठी, भाषेसाठी आणि संस्कृतीसाठी राज ठाकरेंनी आपल्या अंगावर 100 पेक्षा जास्त केसेस घेतल्या आहेत, याची आठवण त्यांनी करून दिली.
स्वतःच्या राज्याकडे लक्ष देण्याचा सल्ला
अविनाश अभ्यंकर यांनी बिहारच्या मंत्र्यांना "अकलेची दिवाळखोरी" पाजळण्यापेक्षा स्वतःच्या राज्याचा विकास करण्याचा सल्ला दिला. "कोणीही आनंदाने स्वतःचे घर आणि राज्य सोडून दुसऱ्या राज्यात येत नाही," असे नमूद करत त्यांनी मंत्र्यांनी बिहारमधील लोकांची परिस्थिती सुधारण्यावर भर द्यावा, जेणेकरून त्यांना रोजगारासाठी बाहेर जावे लागणार नाही, असे सांगितले. मुंबईत देश-विदेशातून उपचारासाठी लोक येतात आणि त्यासाठी उत्तम रुग्णालये आधीच उपलब्ध आहेत, त्यामुळे बिहार भवनाच्या नावाखाली नक्की काय होणार आहे, याकडे राज ठाकरे लक्ष देऊन योग्य वेळी भूमिका घेतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मराठी माणसाला दुय्यम समजू नका
सत्ताधारी नेत्यांनी मराठी माणसाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याबद्दलही अभ्यंकर यांनी संताप व्यक्त केला. गुलाबराव पाटील यांनी "मराठी मुले काम करत नाहीत" असे वक्तव्य केल्याचा संदर्भ देत अभ्यंकर यांनी इशारा दिला की, ज्या मराठी माणसाच्या जीवावर तुम्ही अनेक वर्षे निवडणुका जिंकत आहात, त्याला दुय्यम समजू नका. "सत्तेचा अमरपट्टा कोणीही घेऊन आलेले नाही," असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना या विषयात लक्ष घालण्याची विनंती केली. मराठी माणसाचा अपमान करणाऱ्यांना जनता योग्य वेळी धडा शिकवेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
हेही वाचा - Avinash Jadhav : डोंबिवलीत 'मराठी कार्ड' जोरात! तरुण उद्योजिकेला मज्जाव केल्याने मनसे आक्रमक; अविनाश जाधवांचा थेट इशारा
डोंबिवलीतील मराठी तरुणीला पाठिंबा
यावेळी अविनाश अभ्यंकर यांनी डोंबिवलीतील एका मराठी तरुणीच्या फूड स्टॉलवर झालेल्या कारवाईचा उल्लेख केला. त्या तरुणीचा व्यवसाय अनधिकृतपणे हटवण्यात आला होता, ज्याला मनसेने विरोध केला आहे. "ज्या मराठी ताईंना पोटापाण्याचा प्रामाणिक व्यवसाय करायचा आहे, त्यांच्या पाठीशी मनसे खंबीरपणे उभी राहील," असे त्यांनी सांगितले. अविनाश जाधव यांनी आधीच त्या तरुणीची भेट घेतली असून, राज ठाकरेंचा फोटो असलेल्या गाडीवर कोणीही हात लावण्याची हिंमत करणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. बेकायदेशीर गोष्टींमध्ये लक्ष देण्यापेक्षा प्रशासनाने मराठी उद्योजकांना सहकार्य करावे, अशी मागणी त्यांनी केली.
सरकारच्या लाचारीवर ताशेरे
मुंबई महानगरपालिकेत प्रलंबित असलेल्या महापौर निवडीवरून आणि सरकारच्या कारभारावरही अभ्यंकर यांनी टीका केली. "शेतकरी आत्महत्या करत आहे, बेरोजगारी आणि महागाई वाढलेली आहे, यावर विचार करण्याऐवजी सरकार बिहार भवनासाठी आग्रही का आहे?" असा सवाल त्यांनी विचारला. 106 हुतात्म्यांच्या बलिदानातून मिळालेल्या महाराष्ट्रात मराठी भवनाचे काम प्रलंबित असताना इतर राज्यांच्या भवनांना प्राधान्य देणे ही सरकारची लाचारी असल्याचे त्यांनी म्हटले. आगामी काळात सभागृहात आणि रस्त्यावर मनसे आपली ताकद दाखवून देईल, असा इशारा त्यांनी शेवटी दिला.
हेही वाचा - Balasaheb Thackeray Letter: 'राज तू पुन्हा गाडी वळवलीस...' बाळासाहेबांच्या 'त्या' पत्राने शिवसैनिक गहिवरले