Montha Cyclone: महाराष्ट्रात पुन्हा एकदा अवकाळी पावसाची चिन्हं दिसू लागली आहेत. दक्षिण पूर्व बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या डीप डिप्रेशनमुळे येत्या काही दिवसांत मोठं चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. हे चक्रीवादळ ‘मोंथा’ नावाने ओळखलं जाणार असून त्याचा परिणाम महाराष्ट्रासह देशाच्या पश्चिम भागावर पडण्याची शक्यता आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, 27 ते 30 ऑक्टोबरदरम्यान बंगालच्या उपसागर आणि अरबी समुद्र या दोन्ही भागांत वेगवान बदल होत आहेत. 110 किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून, पुढील काही दिवसांत महाराष्ट्रातील हवामानात मोठा बदल दिसू शकतो.
अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गसह कोकण किनारपट्टीवर मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात मेघगर्जनेसह जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. हवामान तज्ज्ञ अमित भारद्वाज यांच्या माहितीनुसार, डिप्रेशन आणि टर्फ लाइन महाराष्ट्रातून वर सरकत असल्याने हवामानात अस्थिरता वाढली आहे.
हवामान विभागाने विदर्भ आणि मराठवाडा विभागात ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे, तर काही जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट देण्यात आला आहे. या अलर्टनुसार, ताशी 40 ते 50 किमी वेगाने वारे, विजांचा कडकडाट आणि मुसळधार पाऊस अशी परिस्थिती राहू शकते. विशेषत: अमरावती, नागपूर, यवतमाळ, नांदेड, उस्मानाबाद आणि जळगाव या जिल्ह्यांत जोरदार पावसाची शक्यता वर्तवली गेली आहे.
मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये आधीच पावसाने हजेरी लावली आहे. या अवकाळी पावसामुळे शेतकरी वर्गात मोठी चिंता निर्माण झाली आहे. कापूस, सोयाबीन, मका, टोमॅटो आणि कांदा या पिकांचे मोठे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. रायगड आणि पुणे जिल्ह्यांत भातशेती पाण्याखाली गेली असून, काही ठिकाणी कापणीचे काम थांबले आहे.
तज्ज्ञांच्या मते, मोंथा चक्रीवादळाचा महाराष्ट्रावर थेट प्रभाव पडण्याची शक्यता कमी असली तरी त्याच्या परिणामामुळे पाऊस आणि वाऱ्यांचा जोर वाढणार आहे. दिवसाच्या पहिल्या सत्रात ऊन आणि दुपारी अचानक पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. पुढील पाच दिवसांत हवामानात सातत्याने बदल होऊ शकतात. 31 ऑक्टोबरनंतर पावसाचा जोर कमी होऊन हवामान स्थिर होण्याचा अंदाज आहे.