नागपूरकरांनो लक्ष द्या! 6 ऑक्टोबरपासून 36 तास पाणीपुरवठा बंद; ‘या’ भागांतील नागरिकांना करावा लागणार पाणीटंचाईचा सामना

शहरातील पाणीपुरवठा यंत्रणा अधिक सक्षम आणि मजबूत करण्यासाठी पेंच-4 जलशुद्धीकरण केंद्रात विशेष शटडाऊन घेण्यात येणार आहे. त्यामुळे नागपुरातील अनेक भागांचा पाणीपुरवठा सलग 36 तासांसाठी विस्कळीत होणार आहे.
नागपूरकरांनो लक्ष द्या! 6 ऑक्टोबरपासून 36 तास पाणीपुरवठा बंद; ‘या’ भागांतील नागरिकांना करावा लागणार पाणीटंचाईचा सामना
Nagpur water cut

नागपूर शहरातील नागरिकांसाठी नागपूर महानगरपालिका आणि ऑरेंज सिटी वॉटर (OCW) प्रशासनाकडून अत्यंत महत्त्वाची सूचना जारी करण्यात आली आहे. शहरातील पाणीपुरवठा यंत्रणा अधिक सक्षम आणि मजबूत करण्यासाठी पेंच-4 जलशुद्धीकरण केंद्रात विशेष शटडाऊन घेण्यात येणार आहे. त्यामुळे नागपुरातील अनेक भागांचा पाणीपुरवठा सलग 36 तासांसाठी विस्कळीत होणार आहे. 6 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजेपासून हे तांत्रिक काम सुरू होईल, जे 7 ऑक्टोबरच्या रात्री 10 वाजेपर्यंत चालणार आहे. या 36 तासांच्या कालावधीत शहरात पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील अथवा अत्यंत कमी दाबाने होईल.

मानकापूर अन् ओंकारनगर परिसरात मोठे काम; डझनभर टाक्यांचा पाणीपुरवठा प्रभावित

प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, या शटडाऊन दरम्यान मानकापूर नाल्याजवळ 1400 बाय 1400 मिलिमीटर व्यासाच्या मुख्य जलवाहिनीचे (पाईपलाईन) स्थलांतर केले जाणार आहे. याशिवाय ओंकारनगर परिसरामध्ये नवीन फ्लो मीटर बसवण्याचे महत्त्वाचे कामही एकाच वेळी पूर्ण केले जाणार आहे. भविष्यातील पाणीपुरवठा वितरण व्यवस्था सुरळीत राखण्यासाठी ही कामे अत्यंत आवश्यक आहेत. या मोठ्या तांत्रिक कामांमुळे शहरातील सुमारे 12 प्रमुख पाण्याच्या टाक्यांशी जोडलेल्या परिसरातील नागरिकांना पाणीटंचाईचा थेट सामना करावा लागणार आहे.

हेही वाचा – शेतासाठी सगळं पणाला लावलं; वावर विकला, बायकोचं मंगळसूत्र गहाण… तरीही कर्जाचा डोंगर कायम, अखेर सहा ओळींची चिठ्ठी लिहून…

पाण्याचा साठा अन् काटकसरीने वापराचे प्रशासनाचे आवाहन; काम पूर्ण झाल्यावर पाणी पुरवठा टप्प्याटप्प्याने सुरळीत

शटडाऊनच्या काळात नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी मनपा आणि OCW प्रशासनाने आधीच आवश्यक तो पाणीसाठा करून ठेवण्याचे आवाहन केले आहे. तसेच उपलब्ध पाण्याचा अत्यंत काटकसरीने वापर करावा आणि पाण्याचा कोणताही अपव्यय टाळावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. 7 ऑक्टोबरच्या रात्री 10 वाजता तांत्रिक काम पूर्ण झाल्यानंतर पाणीपुरवठा पूर्ववत करण्याची प्रक्रिया सुरू होईल. मात्र, सर्व भागांमध्ये पाणी पोहोचण्यास काही अतिरिक्त वेळ लागू शकत असल्याने नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version