वॉशिंग्टन: अंतरिक्ष संशोधनाच्या इतिहासात नवे पान लिहित नासा चे आर्टेमिस II मिशन यशस्वीपणे पूर्ण झाले आहे. चारही अंतराळवीर चंद्राजवळील प्रवास करून सुरक्षितपणे पृथ्वीवर परतले. ओरियन अंतराळयान आज सकाळी पाच वाजून 37 मिनिटांनी अमेरिकेतील सॅन डिएगो किनाऱ्याजवळ प्रशांत महासागरात उतरले. तब्बल 54 वर्षांनंतर मानवाला पुन्हा चंद्राजवळ घेऊन जाणारे हे पहिले मानवरहित नव्हे तर मानवी मिशन ठरले आहे.
या मोहिमेतील सर्वात थरारक क्षण म्हणजे पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करताना निर्माण झालेला सहा मिनिटांचा कम्युनिकेशन ब्लॅकआउट. या काळात अंतराळवीरांचा मिशन कंट्रोलशी संपर्क तुटला होता. अंतराळयानाने प्रचंड वेगाने वातावरणात प्रवेश करताना हजारो अंश तापमान सहन केले. ओरियन कॅप्सूल पॅराशूटच्या सहाय्याने समुद्रात सुरक्षितपणे उतरला आणि आता रिकव्हरी टीमकडून अंतराळवीरांना बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली.
या मोहिमेत कमांडर रीड वाइजमॅन, पायलट विक्टर ग्लोवर, तसेच अंतराळवीर क्रिस्टिना कोच आणि कॅनडाचे जेरेमी हॅन्सन सहभागी होते. त्यांनी ध्वनीच्या वेगापेक्षा 33 पट जास्त (मॅक 33) वेगाने वातावरणात प्रवेश केला, जे अत्यंत धाडसी आणि तांत्रिकदृष्ट्या आव्हानात्मक होते.
या दरम्यान सर्वांच्या नजरा ओरियन कॅप्सूलच्या हीट शील्डवर होत्या, कारण तीच अंतराळयानाला प्रचंड उष्णतेपासून संरक्षण देत होती. 2022 मधील मानवरहित चाचणीनंतर ही पहिली मानवी उड्डाण मोहीम होती. त्यामुळे या यशाने भविष्यातील चंद्र मोहिमांसाठी मोठा आत्मविश्वास निर्माण केला आहे.
हेही वाचा: Weather Update : हवामानात होणार मोठा बदल, कुठे बरसणार सरी तर कुठे तापमान जाणार चाळीशी पार...; जाणून घ्या
अंतराळवीरांच्या सुरक्षित परतीसाठी अमेरिकन नौदलाचा USS John P. Murtha हा युद्धनौका सज्ज ठेवण्यात आला होता. हे जहाज प्रशांत महासागरात तैनात होते. अंतराळयान पृथ्वीवर परतताना तब्बल 39,668 किमी प्रति तास वेगाने आले आणि नंतर हळूहळू गती कमी करत सुरक्षितपणे समुद्रात उतरले.
1 एप्रिल 2026 रोजी फ्लोरिडामधून प्रक्षेपित झालेल्या या मोहिमेने अनेक विक्रम प्रस्थापित केले. विशेष म्हणजे, या मोहिमेने अपोलो 13 मिशन चा विक्रम मोडीत काढत मानवाने अंतराळात गाठलेले सर्वाधिक अंतर गाठले. अंतराळवीर तब्बल 406,771 किलोमीटर अंतरावर पोहोचले होते.
या मोहिमेदरम्यान अंतराळवीरांनी चंद्राच्या दूरच्या भागाचे अद्वितीय दृश्य टिपले, जे यापूर्वी मानवी डोळ्यांनी कधीच पाहिले नव्हते. तसेच त्यांनी पूर्ण सूर्यग्रहणाचाही अनुभव घेतला. भावनिक क्षणांमध्ये त्यांनी चंद्रावरील दोन विवरांना अंतराळयानाच्या आणि वाइजमॅन यांच्या दिवंगत पत्नीच्या नावाने नामकरण करण्याची विनंतीही केली.
एकूणच, आर्टेमिस II मिशन हे केवळ एक यशस्वी अंतराळ प्रवास नसून, भविष्यात चंद्रावर कायमस्वरूपी तळ उभारण्याच्या दिशेने उचललेले ऐतिहासिक पाऊल ठरले आहे.
हेही वाचा: AI In Healthcare: डॉक्टर चुकले, पण AI ने ओळखलं; ChatGPT मुळे समोर आला दुर्मिळ आजार; नेमकं काय घडलं?