Wednesday, June 18, 2025 03:08:21 PM

नॅशनल हेराल्ड प्रकरणात मोठा खुलासा; सोनिया आणि राहुल गांधी यांनी केला 142 कोटींचा घोटाळा

नॅशनल हेराल्ड मनी लाँड्रिंग प्रकरणात सोनिया व राहुल गांधी यांच्यावर 142 कोटींचा गैरव्यवहार केल्याचा ईडीचा आरोप. पुढील सुनावणी 2-8 जुलै दरम्यान होणार आहे.

नॅशनल हेराल्ड प्रकरणात मोठा खुलासा सोनिया आणि राहुल गांधी यांनी केला 142 कोटींचा घोटाळा

नवी दिल्ली: नॅशनल हेराल्ड मनी लाँड्रिंग प्रकरणात काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. या प्रकरणात काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि खासदार राहुल गांधी यांनी तब्बल 142 कोटी रुपयांचे आर्थिक गैरव्यवहार केल्याचा दावा अंमलबजावणी संचालनालयाने (ED) केला आहे. दिल्लीत राऊज अॅवेन्यू न्यायालयात खटल्याच्या सुरुवातीच्या युक्तिवादांदरम्यान ही माहिती देण्यात आली.

विशेष न्यायाधीश विशाल गोगणे यांच्या समोर ईडीने सांगितले की, ‘यंग इंडियन प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीमार्फत सोनिया गांधी, राहुल गांधी आणि इतर आरोपींनी 'अ‍ॅसोसिएटेड जर्नल्स लिमिटेड' (AJL) वर ताबा मिळवून नॅशनल हेराल्डच्या नावाखाली असलेली अंदाजे 2,000  कोटी रुपयांची मालमत्ता त्यांच्या नियंत्रणात आणली.

हा खटला 2014 साली भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी दाखल केलेल्या खाजगी तक्रारीवर आधारित असून, त्याची दखल न्यायालयाने जून 2014 मध्ये घेतली होती. ईडीने मात्र 2021 मध्ये या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी सुरू केली. यामध्ये सोनिया गांधी, राहुल गांधी, सॅम पित्रोदा, सुमन दुबे, ‘यंग इंडियन प्रा. लि.’ आणि आणखी दोन संबंधित कंपन्यांना आरोपी करण्यात आले आहे.

ईडीच्या म्हणण्यानुसार या सर्वांनी एक संगनमत तयार करून, यंग इंडियनच्या माध्यमातून AJL वर ताबा मिळवला. त्यासाठी केलेल्या आर्थिक व्यवहारांमधून तब्बल 142 कोटी रुपयांची रक्कम त्यांच्या ताब्यात आली आहे. 2023 मध्ये ईडीने 751.9 कोटी रुपयांच्या मालमत्तांवर कारवाई केली होती. त्या काळातही या व्यवहारांची साखळी सुरू होती, असा आरोप अतिरिक्त सॉलिसिटर जनरल एस. व्ही. राजू यांनी केला.

याच वेळी बचाव पक्षाच्यावतीने ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी न्यायालयाकडे वेळ मागितली. त्यांनी सादर केलेल्या दस्तऐवजांची संख्या सुमारे 5,000 पाने असल्याने त्यांचे बारकाईने परीक्षण गरजेचे असल्याचे न्यायालयाला सांगितले.

या खटल्याची पुढील सुनावणी 2 ते 8 जुलैदरम्यान दररोज होणार असून, या प्रकरणाचा राजकीय परिणामही मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे.
 


सम्बन्धित सामग्री